Beed Car Accident : एकाच घरातील चौघांचा ज्या बीड-धामणगाव रस्त्यावर अपघाती मृत्यू झाला, त्या रस्त्याचं 'यमलोक राज्यमार्ग' असं नामकरण करुन अनोखं आंदोलन करण्यात आलं. दोन दिवसांपूर्वी पुण्याहून येत असताना बीड-धामणगाव रोडवर अपघात झाला आणि एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर आज बीडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी अनोखं आंदोलन करत या रस्त्याचं 'यमलोक राज्यमार्ग' असं नामकरण केलं.


बीड-धामणगाव-नगर राज्यमार्ग क्रमांक 2 हा दौलावडगाव, कारखेल, म्हसोबावाडी, धामणगाव, डोईठाण या मार्गे बीडला जातो. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अपघात होतात. वेडीवाकडी वळणं, अवघड घाट असतानाही या ठिकाणी कोणतेही दिशादर्शक फलक अथवा अपघाताची माहिती देणारे फलक लावलेले नाहीत. त्यातच दोन दिवसांपूर्वीच्या अपघातात कुटुंबातील चार जण जागीच गतप्राण झाले. फलक नसणे आणि अपघातांचं वाढ प्रमाण याच्याविरोधात बीडमधल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी या रस्त्याला 'यमलोक राज्यमार्ग' असं नाव दिलं.


सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्र भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली बीड-धामणगाव-अहमदनगर राज्य महामार्गावरील वाढते अपघात आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, आरटीओ आणि लोकप्रतिनिधींकडून दुर्लक्ष याच्या निषेधार्थ या राज्यमार्गाचे महाविकास आघाडी पुरस्कृत मृत्युमार्ग असं नामकरण करण्यात आलं. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री, बीडचे सामाजिक न्याय मंत्री यांचे मुखवटे धारण केले होते. आंदोलनात भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड शेख युनुस च-हाटकर, भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष पाटोदा हमीदखान पठाण, बलभीम उबाळे, म्होसाबावाडीचे सरपंच बाळासाहेब शेकडे, शिवदास शेकडे व ग्रामस्थ सहभागी झाले होते. 


एका प्रतिष्ठित व्यापारी कुटुंबातील चौघांचा दुर्देवी मृत्यू
बीडमधील प्रसिद्ध व्यापारी असलेल्या टेकवाणी कुटुंबातील पाच जण 12 मे रोजी पुण्याहून बीडकडे येत होते. धामणगांव घाटात त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. या अपघातात टेकवाणी कुटुंबातील सुनील टेकवाणी, शंकर टेकवाणी, सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला. टेकवाणी कुटुंब बीडमधील एक प्रतिष्ठित व्यापारी कुटुंब म्हणून ओळखलं जातं. एकाच कुटुंबातील चौघांच्या झालेल्या अपघाती मृत्युमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.


धामणगाव घाटातील वाहतूक काही काळ ठप्प
अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. तसंच अपघातामुळे धामणगाव घाटातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.