बीड : सार्वजनिक गणेशोत्सव म्हटलं की वर्गणी आलीच. गणेशमंडळानी जमा केलेल्या याच वर्गणीतून रोषणाई, सजावट आणि मिरवणुकीवर लाखोंचा खर्च केला जातो. पण या वर्गणीतून बीड जिल्ह्यातल्या टोकवाडी गावच्या गणेश मंडळाने खास उपक्रम राबवला आहे. हा उपक्रम म्हणजे गावात सार्वजनिक शौचालयं उभारुन गाव हागणदारीमुक्त करायचा.


बीड जिल्ह्यातील टोकवाडी गावात 16 वर्षांपासून एक गाव, एक गणपती हा उपक्रम राबवला जातो. तेव्हापासून गावात दरवर्षी जमा झालेल्या वर्गणीतून सामाजिक उपक्रम राबवायची परंपरा आहे. त्याच धर्तीवर यंदा गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी टोकवाडी गावात चार सार्वजनिक शौचालयं बांधण्यात आली आहेत.

डॉ. राजाराम मुंडे यांनी 16 वर्षापूर्वी गावातील लोकांना एकत्र करुन वरद गणेश मंडळाची स्थापना केली. तेव्हापासून या गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला जातो. प्रत्यक वर्षी वर्गणीतून जमा होणार्या पैशांमधून गणेश मंडळाचे सदस्य आणि गावकरी मिळून विविध उपक्रम राबवतात. यावर्षी गणेश मंडळाने गावात तब्बल दीड लाख रुपय खर्च करुन चार सार्वजनिक शौचालयं बांधली आहेत.

या मंडळात शंभरहून अधिक सदस्य आहेत. प्रत्यक महिन्याला या सदस्यांची बैठक होते आणि यात गावाच्या मुलभूत सुविधावर चर्चा केली जाते. यातच गाव हागणदारीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर सदस्यांनी आणि गावकऱ्यांनी मिळून एक लाख 75 हजार रुपयांची वर्गणी जमा केली. त्यातून दीड लाख रुपये खर्च करुन शौचालयं उभारली.

या गणेश मंडळाच्या वतीने दर वर्षी टोकवाडी फेस्टिव्हलचं आयोजन करण्यात येत. यामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. महिन्यातून एकदा स्वच्छता दिंडी काढली जाते. गावात प्रत्यक गल्लीमध्य दुतर्फा झाडं लावण्यात आली आहेत. गणेशोत्सवाच्या काळात बाहेरुन येणाऱ्या लोकांना राहण्यासाठी भक्त निवासही बांधण्यात आलं आहे.

गावात आता शौचालयं उपलब्ध झाल्याने महिलांना मोठा फायदा होत आहे. गाव रोगराईमुक्त होण्यास मदत होत आहे. या उपक्रमानंतर गावाकऱ्यांमध्ये जनजागृती झाल्याने लोक या शौचालायांचा वापर करत आहेत.