पंढरपूर :  कोरोनाच्या काळात राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. वीज बिल माफीबाबत घोषणा करून जनतेला फसवणाऱ्या ठाकरे सरकारला  या विधानपरिषद निवडणुकीत जोरदार शॉक द्या, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. आज पुणे पदवीधर मतदारसंघातील भाजप उमेदवार संग्राम देशमुख आणि शिक्षक मतदारसंघातील उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ बोलावलेल्या मेळाव्यात फडणवीस बोलत होते. यावेळी खासदार रणजित निंबाळकर , खा जय सिद्धेश्वर स्वामी, आ सुभाष देशमुख, आ विजय देशमुख, आ प्रशांत परिचारक, आ गोपीचंद पडळकर, आ राम सातपुते, आ रणजितसिंह मोहिते पाटील, आ राजा राऊत यांचेसह माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे आणि जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख अशी भली मोठी फौज या प्रचारात उतरली होती.


आपल्या भाषणात फडणवीस यांनी या तीन पक्षांच्या सरकारवर टीका करताना बिहारच्या निकालांनी यांचा फुगा फुटल्याचे सांगितले. जे वातावरण बिहारसह अन्य राज्यात आहे, तेच महाराष्ट्रात असून देश फक्त मोदींवर विश्वास ठेवत असल्याचा टोला लगावला .


यावेळी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर यांनी बोलताना जर तुम्ही भाजपच्या नेत्यांवर बोललं तर तुम्हालाही जशास तसे उत्तर मिळेल,  मग पुन्हा गोपीचंदच्या नावाने ओरडू नका असा इशारा  राष्ट्रवादी आणि इतरांना दिला. यावेळी लक्षण ढोबळे, मुन्ना महाडिक, सुभाष देशमुख यांनीही राज्य सरकारवर जोरदार टोलेबाजी केली


दरम्यान वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज्य सरकारला शॉक देण्यासाठी 23 नोव्हेंबर रोजी राज्यव्यापी भाजपकडून वीज बिल होळी आंदोलन करण्यात आलं. भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यात नागपुरातून चंद्रशेखर बावनकुळे, तर चंद्रपुरातून सुधीर मुनंगटीवार, मुंबईतून अतुल भातखळकरयांच्यासह अन्य सहकारी सहभागी झाले होते.


26 नोव्हेंबरला वाढीव वीज बिलाबाबत मनसेकडून राज्यव्यापी आंदोलनाची हाक  


वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर मनसेही आक्रमक झाली असून उग्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीनं ठाकरे सरकारला देण्यात आला आहे. मनसेच्या वतीनं 26 नोव्हेंबरला वाढीव वीज बिलांच्या मुद्द्यावर राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली आहे. वाढीव वीज बिलाविरोधात प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. "वाढीव वीज बिलात सवलत दिली जाईल असं सरकारनेच जाहीर केलं होतं. परंतु दिलासा देण्यास सरकारने नकार दिला आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेची फसवणूक आहे. सरकारने दिलेला शब्द पाळावा," असं मनसेचे नेते बाळा नांदगावकर म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.