पंढरपूर : राज्यातील तीन पक्षांचे सरकार हे त्यांच्या वजनानेच पडणार असून यानंतर भाजप लगेच स्वबळावर सत्ता स्थापन करेल. यासाठी कोणताही मुहूर्त ठरवलेला नसल्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पंढरपूर येथे पदवीधर उमेदवाराच्या प्रचारासाठी आले असता ते बोलत होते. आज देवेंद्र फडणवीस यांनी सुरुवातीला दिवंगत जेष्ठ आमदार सुधाकर परिचारक यांचे घरी जाऊन कुटुंबियांचे सांत्वन केले आणि नंतर भगताचार्य कै वा ना उत्पात यांचे घरी भेट दिली. यानंतर कार्तिकी यात्रेच्या तोंडावर मंदिरात न जाता नामदेव पायरी जवळूनच विठ्ठलाचे दर्शन घेतले. यावेळी आमदार सुभाष देशमुख, विजय देशमुख, रणजितसिंह मोहिते पाटील, प्रशांत परिचारक, गोपीचंद पडळकर, राम सातपुते, खासदार रणजित निंबाळकर, खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे उपस्थित होते.



असले सरकार चालत नसते, आम्हाला कोणतीही घाई नाही वाट बघा असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. संजय राऊत यांच्याकडून ईडी प्रकरणातील कारवाईनंतर होत असलेल्या टीकेचा समाचार घेताना संजय राऊत यांच्यापेक्षा खालच्या पातळीवर आम्हाला बोलता येते, मात्र आमची ती संस्कृती नाही. ते वापरतात त्यापेक्षा वाईट शब्द आम्ही वापरू शकतो असं फडणवीस यांनी म्हटलं. असे शब्द केवळ होत असलेल्या कारवाईच्या भीतीमुळे संजय राऊत बोलत असल्याचे सांगताना जर चूक नसेल तर कशाला कारवाई होईल आणि अशी चुकीची कारवाई केल्यावर कोर्ट सोडेल का? असा सवालही देवेंद्र फडणवीस यांनी केला.


चुकीच्या पद्धतीने केलेल्या कारवाईबाबत काय होते ते अर्णब गोस्वामी यांच्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाने दाखवून दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. केंद्रीय संस्थांच्या गैरवापराची एकही केस दाखवा असे आव्हान देताना गैरवापर केला असता तर परिस्थितीच वेगळी दिसली असती. पंतप्रधान अथवा केंद्रीय गृहमंत्री कधीही या संस्थांच्या कामात हस्तक्षेप करत नसल्याचे फडणवीस यांनी सांगितले . संजय राऊत देत असलेल्या फालतू धमक्यांना आम्ही भीक नाही घालत, असंही संजय राऊत यांनी म्हटलं.


सध्या संजय राऊत यांना बिहार दिसू लागले असून सत्तेत आल्यावर शिवसेना व संजय राऊत कसे बदलत गेले हे लव्ह जिहाद प्रकरणावरून दिसतंय. 2014 मध्ये व्हॅलेंटाईन डे दिवशी बसणाऱ्या जोडप्याने मारहाण करणारी शिवसेना आता लव्ह जिहादबाबत अग्रलेख लिहितंय हे पाहून गंमत वाटते, असा टोलाही फडणवीसांनी संजय राऊत आणि शिवसेनेला लगावला .