पैसे आणि मद्य देण्यास नकार दिल्याने अपहरण
कमाल चौक परिसरात परमानंद तलरेजा यांचा कॅफे नाईन नावाचा बिअर बार आहे. रविवारी रात्री परमानंद तलरेजा आपल्या बारमध्ये बसलेले असताना चार गुंड आले. त्यांनी परमानंद यांच्याकडून मद्य आणि पैशांची मागणी करत त्यांच्याशी वादावादी केली.
परमानंद यांनी गुंडांना मद्य आणि पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आकाश चिंचखेडे, मोनू समुद्रे, सौरभ तायवाडे आणि आकाश नागुलकर नावाच्या गुंडांनी चाकू आणि तलवारीच्या जोरावर परमानंद यांचं अपहरण केलं.
मारहाणीत मृत्यू झाला समजून रस्त्यावर फेकलं
परमानंद यांना नेताना गुंडांनी बिअर बारच्या बाहेर लागलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे फोडून टाकले. त्यानंतर परमानंद यांना अज्ञातस्थळी नेऊन त्यांच्यावर चाकू आणि तलवारीने हल्ला करत गंभीर जखमी करण्यात आलं.
परमानंद यांचा जीव गेला असं समजून गुंडांनी थोड्या अंतरावर एका मोकळ्या मैदानात त्यांना टाकून दिलं आणि तिथून पळ काढला. परमानंद यांचे नातलग आणि पोलीस त्यांचा शोध घेत असतानाच, पहाटेच्या सुमारास काही लोकांना परमानंद तलरेजा मैदानात जखमी आणि बेशुद्ध अवस्थेत दिसले.
परमानंद यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्यांची परिस्थिती गंभीर आहे.
दरम्यान, पोलिसांनी चारही गुंडाना अटक केली असून त्यांच्या विरोधात अपहरण आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, या घटनेमुळे पुन्हा एकदा नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचं विदारक चित्र समोर आलं आहे.
संबंधित बातम्या :