बीडमध्ये सात महिन्यांच्या गर्भवतीची पेटवून घेऊन आत्महत्या
एबीपी माझा वेब टीम | 08 May 2018 07:44 PM (IST)
बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या गरोदर महिलेवर गावातीलच नराधमाने अत्याचार केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली.
बीड : बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या गरोदर महिलेवर गावातीलच नराधमाने अत्याचार केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली. हा प्रकार सहन न झाल्याने सात महिन्याच्या गरोदर महिलेने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. बीड तालुक्यातील पारगाव सिरस येथील हा प्रकार आहे. गरोदर महिला बाळंतपणासाठी माहेरी आली होती. नातेवाईकांकडे लग्न असल्याने आई बाहेरगावी गेली होती आणि भाऊ कामानिमित्ताने बाहेर गेला होता. घरात ही गर्भवती महिला एकटीच होती. हीच संधी साधत आरोपी विष्णू नवले या नराधमाने तिच्यावर गरोदर अवस्थेत अत्याचार केला. या घटनेन भयभीत झालेल्या पीडित महिलेने आपली बदनामी होईल यामुळे अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतलं. या घटनेत पीडित महिला 76 टक्के भाजली. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.