Basweshwar Jayanti 2022 : लिंगायत धर्माचे धर्मगुरु, विश्वगुरु महात्मा अर्थात बसवेश्वर  यांचा जन्मदिन वैशाख शुद्ध तृतीया अर्थात अक्षय तृतीयेला (Akshay Tritiya) झाला अशी धारणा असल्याने हा दिवस बसवेश्वर जयंती (Basweshwar Jayanti) म्हणून साजरा केला जातो. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. त्यामुळे त्याचे अनुयायी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागात हा दिवस विशेष उत्साहाने साजरा करतात. यावर्षी बसवेश्वर जयंती 3 मे रोजी म्हणजेच उद्या आहे. 


बसवेश्र्वरांनी स्वतःचा उपनयन-संस्कार करून घ्यायचे नाकारले, यावरून बालपणापासूनच त्यांचा भावहीन कर्मकांडाला विरोध असल्याचे दिसून येते. भव्य मंदिरे बांधण्यावर खर्च करू नये, तीर्थयात्रेला जाण्याची आवश्यकता नाही यांसारख्या मतांवरूनही त्यांनी कृत्रिम कर्मकांडाला विरोध केल्याचे स्पष्ट होते. लिंगायत लोक बसवेश्र्वरांना शिववाहन नंदीचा अवतार मानतात. 


आपल्या विचारांचा प्रसार करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी मठ स्थापन केले आणि तेथे योग्य व्यक्तींची नियुक्ती केली. काश्मीरपासून केरळपर्यंतच्या, राजापासून रंकापर्यंतच्या आणि ब्राह्मणापासून अस्पृश्यापर्यंतच्या अनुयायांचे एक मोहोळच त्यांच्याभोवती जमले होते, यावरून त्यांच्या समर्थ संघटनशक्तीची कल्पना येऊ शकते.


पारंपारिक भारतीय समाजातील वर्णजातिमूलक उच्च-नीच्चता आणि विषमता यांची प्रखर जाणीव बसवेश्र्वरांना झाली होती. म्हणूनच त्यांनी चातुर्वर्ण्याला आव्हान देऊन सर्व मानवांना समान मानले. परिणामतः त्यांच्याभोवती सर्व वर्णातील आणि जातींतील अनुयायी जमा झाले. आंतरजातीय रोटी-बेटी व्यवहार करण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. उदा.. त्यांच्या अनुयायांमध्ये मधुवय्या नावाचा ब्राह्मण आणि हरळय्या नावाचा चांभार यांचा अंतर्भाव होता. त्यांनी मधुवय्याच्या मुलीचे हरळय्याच्या मुलाशी लग्न लावून दिले. त्यांनी शिवनागमय्या आणि ढोर कक्कय्य या अस्पृश्यांच्या घरी जाऊन भोजन केले होते. बाराव्या शतकात बसवेश्र्वरांनी सुरू केलेले हे कार्य निश्र्चित क्रांतिकारक होते.


महत्वाच्या बातम्या :