महाड (रायगड): महाडच्या सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्यानं काल रात्री दोन बस वाहून गेल्या. यातील बरेच प्रवासी अद्यापही बेपत्ता आहेत. पण ही दुर्घटना झाली त्याचवेळी शेकडो जणांचा जीव वाचविण्यासाठी देवदूत मात्र धावून आला.


 

हो देवदूतच... बसंत कुमार नावाच्या पठ्ठ्यानं समयसूचकता दाखवून शेकडो जणांचे जीव वाचवले.

 

महाडचा ब्रिटीशकालीन पूल जिथं सुरु होतो, त्याला चिटकून बसंत कुमारचं गॅरेज आहे. पंक्चर काढणं, हायवेवर वाहनं बंद पडली तर त्यांच्या मदतीला धावणं हे त्याचं नित्याचं काम.

 

काल हाच बसंतकुमार काळ्यामिट्ट अंधारात धावून आला. गॅरेजमधूनच त्यानं दोन बसेस पुलासकट नदीत वाहून गेल्याचं पाहिलं.  त्याच्या काळजाचा ठोका चुकला. पण त्यातूनही स्वत:ला सावरत तो रस्त्यावर आला.

 

उरलेल्या वाहनांना त्यानं पुढं जाऊच दिलं नाही. एकदा विचार करा, जर बसंतकुमार रस्त्यावर उभा राहिला नसता तर? अजून किती जणांना जलसमाधी मिळाली असती.

 

बसंत कुमारनंच या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पण काळ्यामिट्ट अंधारात आणि तुफान कोसळत्या पावसात जिथं फूटभर अंतरावरचा माणूस दिसत नव्हता, पण तरीही त्या काळरात्री बसंत शेकडो जणांसाठी देवदूतासारखा धधावून आला.

 

सकाळपर्यंत बसंत कुमार घटनास्थळावरच होता. एनडीआरएफ, पोलीस आणि अग्निशमन दलाला त्यानं घटनेची माहिती दिली आणि त्यानुसारच शोधकार्यही सुरु करण्यात आलं. सावित्री प्रचंड खवळली आहे, पाण्याला इतका जोर असल्यानं पात्रात पडलेली वाहनं कुठवर गेली असतील हे सांगणं कठीण आहे.

 

लोक देव शोधण्यासाठी मंदिर, मुर्ती आणि दर्ग्यांकडे धाव घेतात. पण देव अशाच बसंत कुमारसारख्या लोकांच्या रुपानं तुमच्यासाठी धावून येतो.

 

 

VIDEO: