पुणे : लोकसभा निवडणुकीत बारामतीची लढत गाजली ती पवार कुटुंबातील लढतीमुळे. सख्खी नणंद आणि भावजयीमधल्या या संघर्षात सुप्रिया सुळेंनी बाजी मारली. मात्र याच संघर्षाचा दुसरा भाग विधानसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. कारण अजित पवारांनीच तसे संकेत दिलेत. त्यामुळे भाऊ विरुद्ध भाऊ आणि काका विरुद्ध पुतण्या असंही युद्ध रंगू शकतं. 


अजित पवार बारामतीतून लढणार नाहीत? बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना? बारामतीत युगेंद्र आणि जय पवार भिडणार? महाराष्ट्राच्या राजकारणात ही चर्चा जोरात रंगलीय आणि त्याचं कारण आहे खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेलं वक्तव्य. 


जय पवार बारामतीच्या रिंगणात? 


बारामतीतून बऱ्याच वेळा लढल्यामुळे आता रस नाही असं दादा म्हणाले आणि त्यांचा धाकटा मुलगा जय पवार यांना रिंगणात उतरवण्याचे संकेतही दिले. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांच्या नावाची चर्चा आहे. त्यामुळे बारामतीत आता लोकसभेतल्या पवार नणंद-भावजयी सामन्यानंतर विधानसभेत पवारांच्याच चुलत बंधूंमध्ये सामना रंगण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. पण याबाबतचा जो काही निर्णय असेल तो पक्षाच्या संसदीय मंडळात होईल, असं दादांच्या नेत्यांकडून सांगण्यात येतंय. 


कर्जत जामखेड किंवा इंदापूरचा पर्याय


दरम्यान, दादा बारामती सोडणार तर मग लढणार कुठून हा प्रश्न विचारला जातोय. त्याचं उत्तर दिलं ते दादांचे पुतणे आणि कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवारांनी. कर्जत जामखेडमधून लढण्याबाबात दादांनी चाचपणी केल्याचा दावा रोहित पवारांनी केलाय. अजितदादांनी इंदापूरचा पर्यायही राखून ठेवल्याचा रोहित पवारांचा दावा आहे. 


त्यामुळे कर्जत-जामखेडमध्ये पवार काका-पुतण्या आणि बारामतीमध्ये पवार चुलत भावंडांत अटीतटीची लढाई पाहायला मिळणार का असा प्रश्न विचारला जातोय. 


अजित पवारांच्या वक्तव्याने काही प्रश्न उपस्थित होतात.दादांना बारामती सोडून वेगळ्या मतदारसंघाची बांधणी करायची आहे का? सुरक्षित मानल्या जाणाऱ्या बारामतीतून मुलगा जयला लॉन्च करायचं आहे का? याआधी लोकसभेत मोठा मुलगा पार्थला फटका बसल्यानं धाकट्या मुलासाठी दादा सावध झालेत का?


पवार कुटुंबीयांचा संघर्ष कोणत्या वळणावर? 


शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजितदादा कुटुंबात एकटे पडले. त्यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार आणि युगेंद्र पवारांनीही त्यांच्याकडे पाठ करून सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची धुरा सांभाळली. अजित पवारांच्या आत्यांनीही त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण मनोमिलन होण्याऐवजी संबंध अधिकच ताणले गेले. इतके की अजितदादांनी लोकसभेत सुप्रिया सुळेंविरोधात स्वत:ची पत्नी सुनेत्रा पवारांना रिंगणात उतरवलं. आता ती चूक झाल्याचं मान्य करून नव्या चर्चेला तोंड फोडलं. 


राज्याच्या राजकारणात प्रभावी असलेल्या पवार कुटुंबातल्या या राजकीय संघर्षानं लोकसभेत अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. आता विधानसभेत हा संघर्ष कोणतं वळण घेतो ते पाहायचंय. 


ही बातमी वाचा: