कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात होर्डिंगबाजी सुरु झाली आहे. "जनतेचं ठरलंय, वारं फिरलंय", "परमनंट आमदार" अशा होर्डिंग कोल्हापुरातील कागल भागात लावण्यात आल्या आहेत. या होर्डिंगची चर्चा सध्या सर्वत्र सुरु आहे.


दिवंगत विक्रमसिंह घाटगे यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, शाहू महाराज व इतर मान्यवर कोल्हापुरात आले होते. मुख्यमंत्री येणार म्हणून समरजीत घाटगे यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत शहरात जागोजागी होर्डिंग लावले होते. विद्यमान आमदार हसन मुश्रीफ यांच्याविरोधात शड्डू ठोकून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर गेली साडेचार वर्ष समरजीत घाटगे यांनी विविध कायर्क्रमातून जोरदार मोर्चेबांधणी केली. त्यांनी आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन वेळा कोल्हापुरात आले.


कागल मतदारसंघ शिवसेनेकडे आहे, परंतु शिवसेनेला हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तगडा उमेदवार मिळत नसल्याने सलग दोन वेळा मुश्रीफ आमदार म्हणून निवडून आले. राज्यात युतीचं सरकार आलं त्यानंतर कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील महापालिका, जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सर्वच निवडणुकांत स्वत: लक्ष घातलं.


जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना घवघवीत यश मिळालं आणि कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदाच जिल्हापरिषदेत भाजपचा अध्यक्ष झाला. चंद्रकांत पाटलांच्या विरोधात हसन मुश्रीफ यांनी मोर्चे काढून आणि विविध मार्गांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करुन हा मतदारसंघ शिवसेनेकडून आपल्याकडे घ्या आणि समरजीत घाडगे यांना युतीचा उमेदवार म्हणून घोषित करा, असे प्रयत्न चंद्रकांत पाटलांनी सुरु केल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात "परमनंट आमदार" या होर्डिंगवरुन हसन मुश्रीफ यांचा खरपूस समाचार घेतला.


राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ यांनी गेल्या दहा वर्षात कागल तालुक्यात विविध योजना आणून त्याचा जनतेला फायदा करून दिला आहे, म्हणून त्यांना कागलच्या मतदारांनी "श्रावणबाळ" अशी उपमा दिली आहे. तर दिवंगत विक्रमसिंह घाडगे यांच्या विकासाचा वारसा घेऊन गेले चार ते साडे चार वर्ष समरजीत घाडगे कागलच्या जनतेपर्यंत पोहचत आहेत. म्हणूनच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत "आमचं ठरलय" हे वाक्य कोल्हापुरातच नाही तर संपूर्ण राज्यभर गाजलं. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निडणुकीत मतदार जनतेने ठरवल्याप्रमाणे वारं फिरवतात की राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफ हेच 'परमनंट आमदार' राहतात हे येणारा काळच ठरवेल.