पंढरपूर : बँक दरोड्यातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळात दिसून आल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या शिष्टमंडळाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आणि फोटो सेशनही झालं, ज्यामध्ये हा आरोपी दिसत आहे.


सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. यासाठी गेलेल्या शिष्टमंडळात बँक ऑफ महाराष्ट्रच्या 70 लाख रुपयांच्या दरोड्यातील आरोपी रामेश्वर मासाळ याचाही समावेश होता.

सांगोला येथील बँक ऑफ महाराष्ट्रची पैसे घेऊन जाणारी व्हॅन लुटण्यात आल्याने खळबळ माजली होती. या तपासात राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूरचे तत्कालीन युवा जिल्हाध्यक्ष रामेश्वर मासाळ याचं नाव पुढे आलं होतं. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीचा शिष्टमंडळात समावेश होतोच कसा, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मंगळवेढा तालुक्यातील राष्ट्रवादी बळकट करण्यासाठी शिष्टमंडळाने शरद पवार यांची भेट घेतली. पवारांसोबत भेट झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी फोटो सेशन केलं, ज्यामध्ये हा दरोड्यातील आरोपी दिसत आहे. राष्ट्रवादीकडून यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.