'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या 51 शाखा बंद होणार
एबीपी माझा वेब टीम | 03 Oct 2018 11:02 PM (IST)
शहरी भागात असलेल्या 51 शाखांमधून कोणताही फायदा होत नसल्यामुळे त्या बंद करण्याचा निर्णय बँक ऑफ महाराष्ट्रने घेतला आहे
मुंबई : 'बँक ऑफ महाराष्ट्र' (BoM) ने आपल्या 51 शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बंद होणाऱ्या सर्व शाखा शहरी भागातील असल्याची माहिती पुणे मुख्यालयातून देण्यात आली. 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या देशभरात एक हजार 900 शाखा आहेत. यापैकी शहरी भागात असलेल्या 51 शाखांमधून बँकेला कोणताही फायदा होत नाही, त्यामुळे या शाखा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आल्याची माहिती. बंद होणाऱ्या शाखांमधील ग्राहकांनी घाबरुन जाण्याचं कारण नाही, कारण तिथल्या खातेधारकांचं दुसऱ्या शाखेत विलीनीकरण करण्यात येणार आहे. संबंधित शाखांचे आयएफएससी कोड आणि एमआयसीआर कोड 31 डिसेंबरपासून कायमस्वरुपी रद्द करण्यात येत आहेत. बंद होणाऱ्या 51 शाखांमधील सर्व बँक ग्राहकांना दिलेले चेकबूक 30 नोव्हेंबरपर्यंत बँकेत परत जमा करण्यास सांगण्यात आलं आहे. नवीन मिळालेल्या आयएफसीएस आणि एमआयसीआर कोडने व्यवहार करण्याच्या सूचना ग्राहकांना देण्यात आल्या आहेत.