मुंबई: मुंबईसह राज्यातील शहरी भागात आता ताडी मिळणारं नाही. कारण, यापुढे ताडी विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. ताडी व्रिकीवरील बंदीसाठी राज्य सरकारनं 2016 साली एक अध्यादेश काढला होता. याच अध्यादेशाला आव्हानं देणाऱ्या अनेक याचिका कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, हायकोर्टानं या सर्व याचिका फेटाळून सरकारच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे.
दुसरीकडे, शहरी भागातील ताड बंदीसोबत इतर ताडी विक्रेत्यांना पुढील काही गोष्टी पाळाव्या लागणार आहेत. ज्या तालुक्यात ताडाची किमान हजार झाडं आहेत तिथेच ताडी विक्रीची परवानगी मिळणार आहे. तसंच फक्त तालुक्यातील भुमीपूत्रांनाच ताडी व्यवसायाचे परवाने मिळणार आहेत.
दरम्यान, अनेक ठिकाणी ताडीच्या नावाखाली भेसळयुक्त ताडीची विक्री केली जाते. यामुळे अनेक तरुण या ताडीच्या आहारी जातात. ताडीत रासायनिक भेसळ केल्यामुळे यापूर्वी अनेकांचे बळी गेले आहेत.
ताडी हे मद्य निराच्या रसापासून तयार करण्यात येते. निरेमध्ये नवसागर टाकल्यानंतर त्याचे ताडीत रुपांतर होते. मात्र अनेक विक्रेते घातक रसायनांचा वापर करुन ताडी बनवतात. त्यामुळे अशी ताडी घातक असल्याचंही समोर आलं आहे. दरम्यान, कोर्टानं याचिका फेटाळल्यानं राज्यातील शहरी भागात ताडीबंदी लागू होणार आहे.