मुंबई : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना (Shivsena) पक्षाला गळती लागली आहे. शिवसेनेचे अनेक आमदार, कार्यकर्ते, आजी-माजी पदाधिकारी देखील शिंदे गटात सामील झाले आहेत. यानंतर आता बाळासाहेबांचे सहाय्यक चंपासिंह थापा (Champasingh Thapa) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिंदे गटात प्रवेश केला आहे. बाळासाहेबांचे (Balasaheb Thackeray) सर्वात विश्वासू अशी चंपासिंह थापा अशी ओळख आहे.
ठाकरे कुटुंबासाठी हा सर्वात मोठा धक्का
चंपासिह थापा यांचे शिंदे गटात जाणे हे राजकीयदृष्ट्या धक्कादायक नसले तरी ठाकरे कुटुंबासाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जातो. चंपासिंह थापा यांच्या शिंदे गटातील प्रवेशाला एक भावनिक किनार आहे कारण थापाला बाळासाहेबांची सावली म्हटले जात होते. गेली अनेक वर्षे बाळासाहेबांचा विश्वासू सेवक म्हणून चंपासिंह थापाकडे पाहिले जात होते. चंपासिंह थापा हे नेपाळचे असून 30 वर्षापूर्वी मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर उदरनिर्वाहासाठी छोटी-मोठी कामे करत होता. मुंबईच्या कबड्डीत के. टी. थापा हे नाव खूप मोठे होते. त्यानंतर के. टी. थापा भांडुपचे नगरसेवक झाले. त्यानंतर के. टी. थापांच्या सोबतीने चंपासिंह थापा मातोश्रीवर आले आणि बाळासाहेबांचा सेवेकरी बनले.
बाळासाहेबांच्या जवळील अतिशय विश्वासू व्यक्ती
चंपासिंह थापा हा बाळासाहेबांच्या जवळील अतिशय विश्वासू व्यक्ती मानली जात होती. बाळासाहेबांच्या जेवणाच्या, औषधाच्या वेळा त्याना सांभाळल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मीनाताईंचे निधन झाल्यानंतर बाळासाहेबांसाठी भावनिक आधार होते. चंपासिंह थापा घरात, समारंभात, दौऱ्यावेळी बाळासाहेबांसोबत कायम दिसले. चंपासिंह थापा यांनी जानेवारी महिन्यात मी बाळासाहेबांनंतर देखील मातोश्रीचा सेवक आहे, असे ठामपणे सांगितले. पण आता आठ महिन्यानंतर अचानक चंपासिंह थापा हे शिंदे गटात सामिल होणे हे राजकीयदृष्ट्या धक्कादायक नसले तरी ठाकरे कुटुंबासाठी धक्कादायक आहे.
नेपाळमध्ये शिवसेना स्थापन करण्यात चंपासिंह थापा यांची महत्त्वाची भूमिका
बाळासाहेबांची जीवापाड काळजी घेणारा थापा हा ठाकरे कुटुंबाचा सदस्य बनला. थापाचे कुटुंब हे नेपाळला आहे. वर्षातून थापा कुटुंबियांना भेटण्यासाठी जातो. नेपाळमध्ये शिवसेना स्थापन करण्यात चंपासिंह थापा यांची महत्त्वाची भूमिका होती.