Bajrang Sonwane : प्रीतम मुंडे (Pritam Munde) यांच्याविरोधात मागील लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणारे राष्ट्रवादीचे नेते बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) पुन्हा लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहेत. बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचा राजीनामा दिला असून, ते आज शरद पवार गटात सहभागी होणार आहेत. त्यामुळे बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या विरोधात बजरंग सोनवणे असाच सामना रंगण्याची शक्यता आहे. बजरंग सोनवणे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यास पंकजा मुंडे यांची अडचण वाढण्याची शक्यता आहेत. 


भाजपकडून पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून कुणाला उमेदवारी मिळणार याची चर्चा सुरु आहे. बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे (विनायक मेटेंच्या पत्नी) यांचे नवा चर्चेत आहेत. अशात बजरंग सोनवणे यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा दिला आहे. तसेच आज ते पुण्यात शरद पवारांच्या गटात सहभागी होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे यांना महाविकास आघाडीकडून बीड लोकसभेची उमेदवारी मिळणार का? हे पाहणं महत्वाचे असणार आहे. 


कोण आहेत बजरंग सोनवणे..



  • अजित पवार आणि धनंजय मुंडे यांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहिजे जाते.

  • येडेश्वरी शुगरच्या माध्यमातून साखर कारखानदारीमध्ये चांगलं काम करत त्यांनी आपला दांडगा संपर्क तयार केला आहे.

  • यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तसेच बीड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.

  • मागच्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रीतम मुंडे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजरंग सोनवणे यांनी निवडणूक लढवली होती आणि मोठी लढत दिली होती.

  • राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बजरंग सोनवणे यांनी धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली अजित पवार गटामध्ये आपले काम सुरू ठेवले होते.

  • बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणे म्हणजे धनंजय मुंडे यांच्यासाठी धक्का मानला जात आहे.

  • बजरंग सोनवणे हे आज शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

  • तसेच बजरंग सोनवणे यांना महाविकास आघाडीकडून बीड लोकसभेची उमेदवारी देखील मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 


ज्योती मेटे देखील इच्छुक? 


विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे नावाची देखील बीड लोकसभेसाठी चर्चा सुरु आहे. ज्योती मेटे शरद पवारांच्या गटात प्रवेश करणार असल्याची देखील माहिती मिळत आहे. तर, मंगळवारी ज्योती यांनी शरद पवारांची भेट घेतल्याची देखील माहिती आहे. त्यामुळे आता ज्योती मेटे की बजरंग सोनवणे कुणाला महाविकास आघाडीची उमेदवारी मिळणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


शरद पवारांचा मास्टरस्ट्रोक! विनायक मेटेंच्या पत्नी करणार शरद पवार गटात प्रवेश, बीडमध्ये पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे?