छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) तोडगा काढण्यासाठी आज पुन्हा एकदा सरकारचं एक शिष्टमंडळ मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या भेटीसाठी जात आहे. या शिष्टमंडळात बच्चू कडू (Bachchu Kadu)  यांचा देखील समावेश आहे. हे शिष्टमंडळ काही वेळापूर्वी छत्रपती संभाजीनगर विमानतळावर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, बच्चू कडू यांनी सोमवारी मनोज जरांगे यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर आज नवीन ड्राफ्ट जरांगे यांच्याकडे सोपवला जाणार आहे. त्यामुळे जरांगे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. तर, 'सगेसोयरे'वर तोडगा निघाल्याचा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. 


याबाबत बोलताना बच्चू कडू म्हणाले की,"मराठा आरक्षण आणि तोडग्याबाबत काल मुख्यमंत्री आणि माझी जवळपास चार तास बैठक झाली. या बैठकीत जरांगेंच्या ज्या काही मागण्या होत्या, त्यावर चर्चा झाली. सगेसोयरे या विषयावरही चर्चा झाली आणि त्यातून एक समाधानकारक तोडगा आम्ही आणला आहे, अशी माहिती बच्चू कडू यांनी दिली. या तोडग्यामुळे जरांगे यांचे समाधान होईल असेही बच्चू कडू म्हणाले. तसेच जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावं अशी आम्ही विनंती करणार असल्याचही बच्चू कडू म्हणाले. सोबतच प्रमाणपत्र वाटपासाठी ज्या काही अडचणी होत्या त्या विभागीय आयुक्तांसोबत आज बैठक घेऊन दूर करणार आहोत. प्रमाणपत्र वाटपायासाठी कॅम्प उघडण्यात येतील. जरांगे यांच्या जवळपास मागण्या पूर्ण करण्यात येतील," असेही बच्चू कडू म्हणाले. 


किरकोळ गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार 


पुढे बोलतांना ते म्हणाले की, "मनोज जरांगे यांनी लिहून दिलेल्या गोष्टींपैकी सरकारने मान्य केलेल्या गोष्टी जरांगे यांना दाखवणार आहोत. काही बदल आहे, ते जरांगे यांनी मान्य केल्यास त्याबाबत अधिसूचना काढण्यात येईल. यापूर्वी काही अधिसूचना काढण्यात आल्या असून, आजही एक अधिसूचना काढण्यात येणार आहे. प्रमाणपत्र देताना कोणते पुरावे ग्राह्य धरायचे, सगेसोयरे कोणाला समजायचं, जिथे पुरावे सापडले असेल त्या ठिकाणी ग्रामपंचायतला यादी लावणे, यासाठी शिबिर भरवणे, आंदोलनादरम्यान दाखल झालेल्या गुन्ह्यातील गंभीर आणि किरकोळ गुन्ह्याची वेगवेगळी यादी तयार केली जाणार आहे. तसेच किरकोळ गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार," असल्याचं बच्चू कडू म्हणाले आहेत. 


सरकार खूप जास्त सकारात्मक 


तर, जरांगे यांनी सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतोय असा आरोप केला असल्याच्या प्रश्नावर बोलतांना बच्चू कडू म्हणाले, "सरकार खूप जास्त सकारात्मक आहे. शिंदे साहेब जे प्रयत्न करत आहेत ते मराठ्यांचं भलं व्हाव यासाठीच आहे. आंदोलन स्थगित करावं किंवा सरकारला वेळ वाढवून द्यावं हा जरांगे यांचा निर्णय असेल. मात्र, आम्ही त्यांचा समाधान करण्याचा प्रयत्न करतोय असं बच्चू कडू यांनी सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


मोठी बातमी! आज पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला; नवीन 'ड्राफ्ट' सादर केला जाणार