Akola News : अकोल्यात (Akola) आज 'किसान ब्रिगेड'च्या वतीने 'शेतकरी लूट वापसी संवाद सभा' पार पडली. यावेळी विविध शेतकरी संघटनांचे नेते पदाधिकारी उपस्थित होते. मात्र, या सभेत प्रहारचे प्रमुख बच्चू कडू आणि क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे प्रमुख रविकांत तुपकर यांनी आक्रमक भाषण करत सरकारला इशारा दिला आहे. त्यांच्या वक्तव्याची सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे. आधी जिल्हाधिकारी कार्यालयाचा गेट तोडलं आता थेट कलेक्टरलाच तोडू असा वादग्रस्त वक्तव्य बच्चू कडू यांनी केलं आहे. तर नेपाळसारखं मंत्र्यांना तुडवल्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असं वक्तव्य रविकांत तुपकर यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळं नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
यानंतर राज्यात होणाऱ्या आंदोलनात आम्ही आता थेट कलेक्टरलाच तोडू,
शहरातील मराठा मंगल कार्यालयात झालेली ही सभा बच्चू कडू आणि रविकातं तुपकर यांच्यामुळं चांगलीच गाजल्याचं पाहायला मिळालं. या सभेसाठी देश आणि राज्यातील शेतकरी नेते अकोल्यात आले होते. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत, बच्चू कडू, रविकांत तुपकर, प्रकाश पोहरे, अजित नवले, विश्वास उटगी आदी नेते या सभेला उपस्थित होते. या सभेत बोलताना 'प्रहार'चे नेते बच्चू कडू यांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या जळगाव येथील आंदोलनानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांचा उल्लेख केला. जळगावातील आंदोलनात आम्ही फक्त जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट तोडलं. यानंतर राज्यात होणाऱ्या आंदोलनात आम्ही आता थेट कलेक्टरलाच तोडू, असा वादग्रस्त इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.
शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी थेट मंत्र्यांना तुडवावं लागेल : तुपकर
शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी थेट 'जेन-झी' आंदोलनादरम्यान नेपाळमधील घटनेचा उल्लेख केला आहे. यानंतर शेतकऱ्यांना न्याय मिळविण्यासाठी थेट मंत्र्यांना तुडवावं लागेल. दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय व्यवस्था जागी होणार नाहीय, असं वादग्रस्त विधान रविकांत तुपकरांनी केलंय. तर, 'भारतीय किसान युनियन'चे नेते राकेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकू नका असं आवाहन केलंय. अकोल्यातील बच्चू कडू आणि रविकांत तुपकर यांच्या विधानांनी राज्यात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकरी कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव, अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशा मागण्या नेत्यांनी केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या: