Maharashtra Politics अमरावती : प्रहार पक्षाचे सर्वेसर्वा आणि आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar) येथे होणाऱ्या भव्य मोर्चाला परवानगी नाकारली असल्याचं समोर आलं आहे. याबाबत स्वत: बच्चू कडू यांनी माहिती दिली आहे. शेतकऱ्यांच्या (Farmers) विविध मागण्यांसाठी उद्या 9 ऑगस्ट रोजी बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चाचे आयोजन केले होते. त्यासाठी त्यांनी राज्यभरातील शेतकरी आणि प्रहारच्या कार्यकर्त्यांना छत्रपती संभाजीनगर येथे मोठ्या संख्येने जमण्याचे आवाहन केले होते.
मात्र उद्याला होणाऱ्या या भव्य मोर्चाला परवानगी नाकारल्याने मोठा पेच उभा राहिला आहे. ही परवानगी नेमकी का नाकारली, हे अद्याप तरी कळू शकलं नाही. मात्र परवानगी नाकारली असली तरी आम्ही छत्रपती संभाजीनगर येथे जाणारच आणि लाखोंच्या उपस्थितीत हा मोर्चा काढणारच, आम्हाला कोण अडवते ते बघू, असा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. त्यामुळे बच्चू कडू यांच्या या मोर्चा कडे सऱ्यांचे लक्ष लागले आहे.
आम्हाला कोण अडवतंय ते बघू, बच्चू कडूंचा निर्धार
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू हे संभाजीनगर येथे लाखोंच्या संख्येने शेतकरी, शेतमजूर यांचा मोर्चा काढणार होते. सोबतच या मोर्च्यातून पुढील राजकीय वाटचाल आणि तिसऱ्या आघाडी बद्दल अधिकृत घोषणा करण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. एकीकडे राज्याचे राजकारण मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन तापलं असताना, बच्चू कडू हे देखील वेळो वेळी आपली वेगळी भूमिका मांडून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करताना दिसले आहे. अशातच आता शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या 9 ऑगस्टला संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू आणि त्यानंतर मग राजकीय वाटचाली संदर्भात अंतिम निर्णय घेऊ, अशी माहिती या पूर्वीच बच्चू कडू यांनी दिली आहे.
मात्र, आता ऐनवेळी या भव्य मोर्चाला परवानगी नाकारल्याने बच्चू कडू चांगलेच आक्रमक झाले असून आम्ही हा मोर्चा कुठल्याही परिस्थित काढूच, असा निर्धार केला आहे. त्यामुळे उद्या या मोर्च्याच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर इथं नेमकं काय होतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू - बच्चू कडू
आमचे मुद्दे हे सर्व जातीमधील शेतकरी कष्टकरी मजुरांचे आहेत. आम्ही इतके मोठे नाही की प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊ किंवा त्यांच्यासोबत जाऊ. तो त्यांचा विषय आहे. सरकारने निर्णय घेतला तर ठीक अन्यथा आम्ही शेतकरी शेतमजुरांची ताकद महाराष्ट्राला दाखवू, असेही बच्चू कडू म्हणाले. सध्याघडीला देशात मोठा प्रश्न आर्थिक विषमतेचा आहे. काम करणार्याला कमी पैसे आणि एजन्टला जास्त पैसे मिळतात. काम न करणार्यासाठी शासन आहे का, अशी एकंदरीत परिस्थिती आहे.
तर दुसरीकडे शासन लेक लाडकी योजना जाहीर करते आहे. कष्ट करणाऱ्याला पैसे दिले पाहिजेत. पैसे नसतील तर त्यांना सल्ला आहे. तर दुसरीकडे गर्व्हनरचा बंगला चाळीस एकर वर आहे. अशा परिस्थितीत तो विका त्याचे एक लाखभर कोटी येतील, असा टोलाही बच्चू कडू यांनी लगावला. ज्या पारशी लोकांनी अत्याचार केले. त्यांच्याकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी मुंबईत आहे. कष्ट करणार्याचे मूल्य जपले पाहिजे. दिव्यांग, कष्टकरी यांचा बजेटमध्ये किती वाटा आहे, हे आम्ही विचारतोय. श्रीमंत अधिक श्रीमंत होण्याचे मार्ग आम्ही तोडतोय. तर येत्या 9 ऑगस्टला संभाजीनगर मध्ये भव्य मोर्चा काढून आमची ताकद दाखवू आणि त्यानंतर मग अंतिम निर्णय घेऊ, असेही बच्चू कडू म्हणाले.
हे ही वाचा