District Skill Development Planning : केंद्र सरकारच्या कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत राज्यातील पाच जिल्ह्यांना पुरस्कार देण्यात येणार आहे. सातारा, सिंधुदुर्ग वाशिम, ठाणे आणि सोलापूर या जिल्ह्यांचा राजधानी नवी दिल्ली येथे उद्या गुरुवारी गौरव होणार आहे. राज्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांनी या पाचही जिल्ह्यांचे अभिनंदन केलेय.
केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास आराखडा स्पर्धेत (Award of Excellence in District Skill Development Planning-DSDP) महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांना 2020-21 साठीचे उत्कृष्ट जिल्हा कौशल्य विकास आराखडा पुरस्कार जाहीर करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर सादरीकरणाकरीता निवड झालेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्र राज्याचे असल्याची माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री राजेश टोपे यांनी दिली. सातारा आणि सिंधुदुर्ग (Award for Excellence), वाशिम आणि ठाणे (Certificate of Excellence) तर सोलापूर (Letter of Appreciation) या जिल्ह्यांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. केंद्रीय कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्री डॉ. धर्मेंद्र प्रधान यांच्या उपस्थितीत उद्या 9 जून 2022 रोजी पुरस्कार वितरण होणार आहे.
कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त तथा कौशल्य विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपेन्द्र सिंह कुशवाह यांनी सबंधित जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी तसेच सदस्य सचिव पदावरील सहाय्यक आयुक्त (कौशल्य विकास) यांचे अभिनंदन केले आहे.
केंद्र सरकारच्या कौशल्य विकास व उद्यमशीलता मंत्रालयाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जिल्हा कौशल्य विकास नियोजनातील उत्कृष्टतेसाठी 2020-21 या पुरस्कार स्पर्धेत देशातील 336 जिल्ह्यांनी सहभाग घेऊन आराखडा सादर केला होता. त्यातून प्राथमिक स्तरावर 30 जिल्ह्यांची केंद्रीय समितीसमोर सादरीकरणासाठी निवड झाली होती. त्यामध्ये राज्यातील पाच जिल्ह्यांच्या कौशल्य विकास कृती आराखड्याचा समावेश होता. राष्ट्रीय पातळीवर सादरीकरणाकरीता निवड झालेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जिल्हे महाराष्ट्र राज्याचे आहेत. जिल्ह्यातील विशिष्ट भौगोलिक तथा सामाजिक स्थिती, परंपरागत व्यवसाय, नैसर्गिक संसाधने तथा साधनसाम्रगी व कुशल मनुष्यबळाची मागणी असलेली क्षेत्रे निश्चित करून जिल्ह्याचा वार्षिक कृत्ती आराखडा राज्यातील सर्व जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समित्यांमार्फत तयार करण्यात आला आहे.