Amravati : महाविकास आघाडी सरकारच्या कारभारावर फक्त अपक्ष आमदार नाराज नसून सर्वच पक्षांचे आमदार नाराज आहे. मंत्र्यांना टक्केवारीचे मोह आहे. तर मुख्यमंत्री भेटण्यासाठी वेळ देत नाहीत. याविरोधात फक्त अपक्ष आमदारच बोलू शकतात. पक्षातील आमदार हे बोलून दाखवू शकत नाही. याची दखल मुख्यमंत्र्यांनी घ्यावी आणि लोकांना कशाची गरज आहे हे समजून कारभार करावा अशी टीका खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर पत्रकार परिषदेद्वारे केली.
मुख्यमंत्री औरंगाबाद येथे सभा घेत आहे. मात्र त्या सभेपूर्वी त्यांनी लोकांसोबत बोलून पाण्याची समस्या जाणून घ्यावी आणि नंतर सभा घ्यावी असा टोलाही राणा यांनी लागावला. अमरावती येथील मेळघाट मधील पाण्याची समस्या बिकट आहे. तीन वर्षात मी तीनशे कोटी रुपये पाणी पुरवठ्यासाठी आणले. मेळघाटमध्ये 'प्रत्येक घरात नळ' असावे असे माझे स्वप्न आहे. त्यासाठी मी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचेही त्या म्हणाल्या.
टक्केवारीचे आरोप खरे
आमदार आशिष जयस्वाल यांनी मंत्र्यांवर लावलेले टक्केवारीचे आरोप खरे आहे. मात्र याबाबत विविध पक्षांच्या आमदारांमध्ये बोलण्याची हिम्मत नाही. हा मुद्दा फक्त अपक्ष आमदारच बाहेर काढू शकतात असेही यावेळी राणा म्हणाल्या.
न्यायालयीन चौकशीसाठी तयार
अमरावती येथे पाण्याची समस्या उद्भवत आहे. त्यामुळे त्याचा आढावा घेत असल्यामुळे आज न्यायालयात जाऊ शकले नाही. मात्र न्यायालय जेव्हाही मला चौकशीसाठी बोलवणार तेव्हा मी जाण्यासाठी तयार असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या.
मोठे उद्योग आणणार!
अमरावती येथील विमानतळ लवकर पूर्ण व्हावे यासाठी आपण पाठपुरावा करत असल्याचे त्या म्हणाल्या. विमानतळ सुरु झाले तर मोठे उद्योगही येथे येतील. विमानतळासाठी पहिला हप्ता केंद्राने दिला असल्याने काम गतीने सुरु आहे. विमानतळ सुरु होण्यासाठी एक ते सव्वा वर्ष लागणार असल्याचेही यावेळी त्या म्हणाल्या.
50 वर्षांचा बँकलॉग काढणे कठीन
पूर्वीच्या जनप्रतिनिधींनी त्यांच्या विभागाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे हा 50 वर्षांचा जुना बँकलॉग भरुन काढणे आणि नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे आपले प्राधान्याने लक्ष असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या.