पुणे :  पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले (Avinash Bhosle) यांना DHFL प्रकरणी  सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे.  गेल्या महिन्यात  अविनाश भोसले यांच्या घर आणि कार्यालयावर सीबीआयनं छापेमारी केली होती.  डीएचएफएल घोटाळा प्रकरणी सीबीआयने पुणे - मुंबई परिसरात छापेमारी केली होती त्यानंतर अखेर आज त्यांना सीबीआयने अटक केली आहे.


एप्रिल महिन्यात अविनाश भोसले यांच्या घरी आणि अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडशी संबंधित असलेल्या ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती. मुंबई आणि पुण्यातील 8 ठिकाणी ही छापेमारी झाली होती. व्यावसायिक आणि रेडियस ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक संजय छाब्रिया यांना येस बँक घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने अटक केली होती. या अटकेशी संबंधित ही छापेमारी होती.


अविनाश भोसलेंवर  ईडीकडूनही कारवाई


 ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयाने अविनाश भोसलेंची 40 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयांनी फेमा (FEMA Act)कायद्याचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली होती. अविनशन भोसले यांच्या जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये विविध कंपन्यांचे शेअर, मालमत्ता, पुण्यातील पंचतारांकित हॉटेल्सचा समावेश आहे. अविनाश भोसले आणि कुटुंबियांच्या बँक खात्यात असणारी 1.15 कोटी रुपयांची रक्कम देखील ताब्यात घेण्यात आली आहे. यामध्ये  हॉटेल वेस्टिन- पुणे  हॉटेल ली मेरिडियन- नागपूर, हॉटेल डब्ल्यू रिट्रीट अँड स्पा-गोवा  याचा समावेश आहे


अविनाश भोसले हे एबीआयएल ग्रुप ऑफ कंपनीचे प्रवर्तक आहेत. अविनाश भोसले हे प्रसिद्ध उद्योगपती आणि महाराष्ट्रातील बड्या राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध असलेले एक व्यक्ती आहेत. ते महाराष्ट्रातील मंत्री आणि कॉंग्रेस नेते विश्वजित कदम यांचे सासरे आहेत.


ईडीच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी पुण्यातील भोसले यांच्या कार्यालयात आणि निवासस्थानी आणि मुंबईतील काही ठिकाणी छापा टाकला होता.  अविनाश भोसले आणि त्यांचा मुलगा अमित या दोघांचीही चौकशी करण्यात आली होती.


कोण आहेत अविनाश भोसले?


अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. रिअल इस्टेट किंग अशीही त्यांची ओळख आहे. अविनाश भोसले हे राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. कोट्यवधी रूपयांचा एबीआयएल ग्रुपचे ते मालक आहेत. आता बांधकाम क्षेत्राशी संबंधित शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर झालेली कारवाई ताजी असतानाच ईडीने भोसले यांच्यावरही कारवाईचे पाऊल उचलल्याने मोठी खळबळ उडाली आहे.