Avinash Bhosale and Dilip Chhabria : नीरव मोदी आणि विजय मल्या, डी.एस. कुलकर्णी यांच्यानंतर आता अविनाश भोसले आणि दिलीप छाब्रिया हे दोन उद्योजक सध्या केंद्रीय तपासयंत्रणेच्या कचाट्यात सापडलेत. पुण्यातील उद्योजक अविनाश भोसले यांनी हजारो कोटींचा घोटाळा करून त्या पैशातून परदेशांत मालमत्ता खरेदी केल्याचा आरोप सीबाआयनं केला आहे. तर डीसी मोटर्सचे मालक दिलीप छाब्रिया यांच्या विरोधात ईडीकडून मनी लाँड्रिंग प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. ईडीनं नुकतीच मुंबई आणि पुण्यातील सुमारे सहा ठिकाणी याबाबत छापेमारी केली. मुंबई पोलिसांच्या सीआययू युनिट आणि ईओडब्ल्यूने छाब्रिया आणि त्यांच्या कुटुंबियांवर साल 2020 मध्ये नोंदवलेल्या खटल्यांच्या आधारे हा मनी लाँड्रिंगचा गुन्हा नव्यानं दाखल करण्यात आला आहे.


सीबीआयनं अविनाश भोसलेंविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक गंभीर आरोप केले आहेत. लंडनमधील फाईव्ह स्ट्रँड ही अलिशान आणि ऐतिहासिक वारसा असलेली ईमारत साल 2018 मध्ये भोसलेंनी खरेदी केली होती. या ईमारतीचं दोनशे खोल्यांच्या आलिशान हाॅटेलमध्ये रुपांतर करण्याचा त्यांचा मनोदय होता. लंडनमधील मानाच्या आणि प्रसिद्ध अश्या बर्मिंगहम पॅलेसजवळ ही मालमत्ता असल्यामुळे एकी भारतीय उद्योजकाने ही ईमारत खरेदी केल्याबद्दल मोठी चर्चाही झाली होती.


भोसलेंवर काय आहेत आरोप - 


तब्बल एक हजार कोटींना हा सौदा झाल्याची चर्चा होती. यापैकी 700 कोटी रुपये कर्ज स्वरुपात भोसलेंनी येस बॅंकेकडून घेतले होते.मात्र या कर्जात अनियमितता आहे, केवळ कन्सलटन्सी फ्री म्हणून 69 कोटी भोसलेंना दिले गेलेत तर रेडीयस ग्रूप कडून 183 कोटी आणि डीएचएफएलकडून यांच्याकडून एकूण 317 कोटी रुपये जमवत स्वतःच्या कंपनीतून 300 कोटी टाकले होते. हा व्यवहार सध्या सीबीआयच्या रडारवर आहे. या व्यवहारांचा तपशिल काय होता? याचाच तपास सीबीआय करीत असून अटकेत असलेले अविनाश भोसले अद्याप न्यायालयीन कोठडीतच आहेत. दिलीप छाब्रिया यांनी आपल्या डीसी डिझाईन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकरता काही नॉन बँकिंग वित्तीय कंपन्यांकडून कथित ग्राहक बनून कर्ज घेतल्याचं आढळून आल्यानं मुंबई पोलिसांनी 28 डिसेंबर 2020 रोजी दिलीप छाब्रिया यांना अटक केली होती. दिलीप छाब्रिया यांच्यावर आतापर्यंत तीन गुन्हे दाखल आहेत. यापैकी दोन सीआययूनं तर एक मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं केला आहे.


काय आहे प्रकरण -


छाब्रिया यांच्या विरोधात मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोप केला आहे की छाब्रिया यांनी काही नॉन बँकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन च्या अधिकार्‍यांशी संगनमत करून त्यांच्या कंपनीकडून कार खरेदी केलेल्या ग्राहकांच्या नावांचा बेकायदेशीरपणे वापर करून कोट्यावधींचं रुपयांचं कर्ज घेतलं. हे कर्ज फेडण्यात छाब्रिया अयशस्वी ठरले, त्यामुळे त्यांचा मुलगा, बहीण आणि एनबीएफसीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यालादेखील या प्रकरणात आरोपी करण्यात आलं आहे.


बीएमडब्ल्यू फायनान्सच्या अधिकार्‍यांची चौकशी-


दिलीप छाब्रिया यांच्याकडील 41 कार पैकी 25 कारचे रजिस्ट्रेशन करण्यात आलेलं नव्हतं. मात्र , बीएमडब्ल्यू फायनान्स कंपनीनं या 41 गाड्यांना तब्बल 58 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिल्याचा मुंबई पोलिसांचा आरोप आहे. आतापर्यंत पोलिसांकडून या प्रकरणी फायनान्स कंपनीच्या चार अधिकाऱ्यांची चौकशी झालेली आहे, यामधील एक आरोपी फरार आहे. दोन बीएमडब्ल्यू फायनान्स अधिकाऱ्यांना चौकशीसाठी समन्स पाठवलेले आहे. तर बीएमडब्ल्यूच्या दोन जर्मन नागरिकांनादेखील मुंबई पोलिसांकडून यापूर्वीच समन्स पाठवण्यात आलेले आहे. हे दोन्ही जर्मन नागरिक बीएमडब्ल्यू फायनान्सशी संबंधित असल्याचं समोर आलेलं आहे.