मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेला आपण पुन्हा बहुमताने निवडून येऊ, अशी अपेक्षा होती. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारावेळी देवेंद्र फडणवीस अनेक भाषणात 'मी पुन्हा येईन'चा नारा देत होते. (मी पुन्हा एकदा बहुमताने महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईन, अशी देवेंद्र फडणवीस घोषणा देत होते.)निवडणुकीचा निकाल लागून आता 15 दिवस उलटले आहेत. अपेक्षेप्रमाणे भाजप-शिवसेना महायुतीला राज्यातील जनतेने बहुमत दिलं आहे. परंतु अद्याप भाजप-शिवसेनेने सत्तास्थापन केलेली नाही. यावरुन भाजप-शिवसेनेवर टीका सुरु आहे.

भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करणाऱ्यांमध्ये आता राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांची भर पडली आहे. जयंत पाटील यांनी 'मी पुन्हा येईन'चा नारा देणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांना एका ट्वीटद्वारे जोरदार टोला लगावला आहे. परंतु ट्वीट करताना जयंत पाटील यांनी व्याकरणाची एक चूक केली आहे. या चुकीमुळे मराठीतील प्रसिद्ध संगीतकार अवधूत गुप्ते यांनी जयंत पाटलांचे कान टोचण्याचं काम केलं आहे.

जयंत पाटील यांनी ट्वीट केलं आहे की, 'मी पुन्हा येईल'म्हणणाऱ्यांना निकाल लागूनही सरकार बनवणे शक्य होत नाहीये, म्हणूनच आता विरोधी पक्षातून आमदार फुटण्याच्या खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. कोणत्याही पक्षातून आमदार फोडण्याचा प्रयत्न झाल्यास सर्व पक्ष एकत्र येऊन फुटणाऱ्या आमदारास पराभूत करू.

पाटील यांनी ट्वीटमध्ये 'मी पुन्हा येईन'ऐवजी 'मी पुन्हा येईल' असं लिहिलं आहे. पाटील यांनी 'न' ऐवजी 'ल' असं लिहिलं आहे. मराठी व्याकरणातील ही एक चूक अवधूत गुप्ते यांनी निदर्शनास आणून देण्याचं काम केलं आहे. यावेळी गुप्ते यांनी इमोजीद्वारे रागही व्यक्त केला आहे.

दरम्यान, जयंत पाटलांची चूक दाखवत असताना अवधूत गुप्ते यांनीदेखील एक चूक केली आहे. त्यांनी 'राजकारण' लिहिण्याऐवजी 'राजकाराण' असं लिहिलं आहे. त्यामुळे अनेक नेटीझन्सनी अवधूत गुप्तेचेही कान टोचण्याचं काम केलं आहे.

शिवसेनेचे आमदार फोडले तर पुन्हा निवडून आणू, राष्ट्रवादीच्या जयंत पाटलांचा भाजपला इशारा 



भाजपकडून आघाडीच्या काही आमदारांना आमिष : जयंत पाटील | ABP Majha