परभणी : परभणीच्या मुरुंबा गावात अचानक 900 पेक्षा जास्त कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. पशुसंवर्धन विभागाने गावात भेट देऊन मृत पक्षांचे नमुने पुण्याला पाठवण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. दरम्यान याचा संसर्ग वाढू नये म्हणून मुरुंबा आणि आसपासच्या 5 किलोमीटर परिसरात कुक्कुट विक्रीवर प्रशासनाने बंदी घातली आहे. अहवाल आल्यानंतरच कोंबड्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हे स्पष्ट होईल,


परभणीच्या मुरुंबा गावातील शेतकरी विजय झाडे यांच्या 100, रामचंद्र प्रजापती यांचे 100 ,प्रभाकर झाडे यांचे 500 तर विठ्ठल झाडे यांचे 200 कोंबडे असे मिळून 900 पेक्षा जास्त कोंबडे मागील दोन दिवसांपासून मृत्युमुखी पडत आहेत. त्यांनी याबाबत जेव्हा पशुसंवर्धन विभागाला सांगितले तेव्हा पशुसंवर्धन विभागाचे पथक गावात पोहोचले असून मृत कोंबड्यांचे नमुने हे पुणे येथील प्रयोग शाळेत पाठवण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा प्रशाससाने पत्रक काढून मुरुंबा आणि आसापासच्या 5 किलोमीटर परिसरात कुक्कुट खरेदी, विक्री बाजारावर प्रतिबंध लावले आहे. इतर कुठेही असे प्रकार झाल्यास तात्काळ पशुसंवर्धन विभागाला सूचना द्यावी असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.


महाराष्ट्रात बर्ड फ्लू नाही : सुनील केदार


राज्यातील विविध जिल्ह्यांमधून पक्षांचे घशातील द्रवांचे नमूने, विष्ठेचे नमूने तसेच रक्तजल नमूने तपासणीत बर्ड फ्लू रोगासाठी नकारार्थी आढळून आले आहे. राज्यात बर्ड फ्लु सर्वेक्षण कार्यक्रम नियमित राबवण्यात येत असून पुढेही सातत्याने राबवण्यात येणार आहे. तसेच सध्या महाराष्ट्रात बर्ड फ्लू नसल्याचे पशूसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत वन्य व स्थलांतरीत पक्ष्यांमध्ये, कावळ्यांमध्ये अथवा कोबड्यांमध्ये बर्ड फ्लु रोगाचा संसर्ग आढळून आलेला नाही अथवा या रोगामुळे मृत्यू झाल्याचे देखील दिसून आलेले नाही. त्यामुळे कुक्कुट पालक, अंडी व मांस खाणाऱ्या मांसाहारी नागरिकांनी अकारण घाबरण्याची परिस्थिती नाही.तसेच स्थलांतरीत होणाऱ्या जंगली पक्षांमध्ये, कावळ्यांमध्ये, परसातील कोंबड्यांमध्ये आणि व्यावसायिक स्तरावर कुक्कुट पालन होणाऱ्या ठिकाणावर असाधारण स्वरुपाचा मृत्यू आढळून आल्यास त्वरीत नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधण्यात यावा, असं आवाहन केदार यांनी केले.


संबंधित बातम्या :