औरंगाबाद : औरंगाबादचा कचरा पेटला आहे. प्रशासन आणि गावकऱ्यांमध्ये संघर्ष होत आहे. औरंगाबाद शहर कचऱ्यामध्ये बुडून गेलंय. पण याच शहरातले दोन वॉर्ड मात्र या वादापासून अलिप्त आणि चकचकीत आहेत.

विश्रांतनगरच्या एन थ्री आणि एन फोर वॉर्डातली ही किमया झाली तरी कशी? रोज पहाटे इथे मनपाचे कर्मचारी येतात. वॉर्डातले लोक ओला आणि सुका कचरा वेगळा करतात. गुरांना खाता येईल असा कचरा वेगळा होतो.

याच वॉर्डात असलेल्या डम्पिंग ग्राऊंडवर कचरा जातो. तिथे त्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. कचरा लवकर कुजतो, वास कमी येतो आणि त्यातून तयार झालेला कचरा शेतकऱ्यांना मोफत दिला जातो. नगरसेवक प्रमोद राठोड यांच्या पुढाकाराने हे प्रत्यक्षात अवतरलं.



लोकांमध्येच कचऱ्याबाबत सजगता असल्याने बेल्वे, सीरिंज, सॅनेटरी नॅपकिन आणि औषधासारख्या कचऱ्याला स्वतंत्र केलं जातं. त्यामुळे कर्मचाऱ्यांनाही कचरा संकलनात अडचण येत नाही

गेल्या 3 वर्षांपासून चिमूटभर कचराही या वॉर्डाच्या बाहेर गेलेला नाही. एक खासदार, तीन आमदार, 115 नगरसेवक, 15 लाख लोकसंख्या, 1250 कोटींचं बजेट, पण तरीही शहर बकाल झालं. या दोन वॉर्डातला प्रयोग प्रत्येक वॉर्डात, शहरात वापरला गेला.

आपला कचरा आपल्याच घरात जिरवला, तर अशी आणीबाणीची वेळ येणार नाही, हे आता तरी प्रत्येक शहराने लक्षात घ्यायला हवं.