औरंगाबादमध्ये पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने तरुणाचा मृत्यू
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद | 27 Jan 2017 12:18 PM (IST)
औरंगाबाद : पोलिसांच्या गाडीतून उडी मारल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना औरंगाबादमध्ये घडली आहे. राहुल गायकवाड असं या तरुणाचं नाव आहे. मोटारसायकल चोरीच्या चौकशीसाठी राहुल गायकवाडला क्राईम ब्रान्चने चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. तपासासाठी आज घेऊन जात असताना राहुलने पोलिसांच्या गाडीतून उडी मारली. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. मात्र पोलिसांच्या मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचा दावा मयत राहुल गायकवाडच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा इशारा मृत राहुल गायकवाडच्या नातेवाईकांनी दिला आहे.