कोल्हापूर : शाहरुख खानला पाहायला जशी गर्दी जमते तशी गर्दी कोल्हापूरच्या अर्धा शिवाजी चौकात जमली आहे. निमित्त आहे ते रिक्षा सजावट स्पर्धेचं. वेगवेगळ्या रंग-रुपात सजलेल्या रिक्षा कोल्हापूरवासियांचं लक्ष वेधून घेत आहेत.

कुठे शिवाजी महाराज, कुठे विठ्ठल रखुमाई, कुठे बीगल बी तर कुठे एपीजे अब्दुल कलाम. आपलीच रिक्षा सगळ्यात भारी दिसावी म्हणून सगळ्या रिक्षाचालकांनी आपापल्या रिक्षांना हा साज चढवला आहे. अस्लम शेख हा रिक्षाचालक तर सलग 12 वेळा ही स्पर्धा जिंकल्याचं सांगतो.

फुल्ल स्पीडमध्ये रिव्हर्स चालणाऱ्या एका रिक्षाने सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकवला. रॅम्पवर चालणाऱ्या एक सो एक रिक्षांनी सगळ्यांनाच भुरळ घातली. एखाद्या इंपोर्टेड गाडीला मागे टाकेल अशा या रिक्षा आहेत.

काही रिक्षांमध्ये तर बॅक कॅमेरा आणि प्रथमोपचार पेटीसोबत एसी आणि फ्रिजही ठेवण्यात आला आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, बेळगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणाहून सुमारे 100 हून जास्त रिक्षा या स्पर्धेत सामील व्हायला आल्या आहेत. या हटके स्पर्धेच्या आयोजनामुळे आयोजकही काहीसे भावुक झालेले दिसतात.

रोजच्या कमाईवर पोट भरणाऱ्या रिक्षाचालकांना या स्पर्धेच्या निमित्ताने थोडा विरंगुळा मिळाला आणि जी रिक्षा आयुष्यभर रोजगार मिळवून देते तिला सजवायची संधीही...!

पाहा आणखी फोटो