औरंगाबाद : औरंगाबादमध्ये कॉपी करताना पकडल्यावर पुन्हा एका विद्यार्थ्याने मुजोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. कर्मचाऱ्याला मारहाण करत त्याने आत्महत्या करण्याची धमकी दिली.
सतीश राजीव वाघमारे असं कॉपी करणाऱ्या विद्यार्थ्याचं नाव आहे. सतीश हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शारीरिक शिक्षणशास्त्र विभागात एमपीएडचा विद्यार्थी आहे.
औरंगाबादमधील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात एमपीएड परीक्षेच्या पहिल्याच पेपरमध्ये सतीश कॉपी घेऊन जात होता, त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला मज्जाव केला. यामुळे चिडलेल्या सतीशने कर्मचाऱ्याला मारहाण केली.
मारहाण करुन सतीश थांबला नाही, तर दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारण्याची धमकी देत त्याने गोंधळ घातला. या घटनेनंतर भेदरलेल्या प्रशासनाने तातडीने पोलिसांना बोलावलं. या प्रकरणी विद्यार्थ्याची चौकशी सुरु आहे.
'नोकरीसाठी 35 लाख भरलेत, कॉपी करु द्या, नाहीतर आत्महत्या करेन'
अवघ्या काहीच दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीएड अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षेदरम्यान असाच प्रकार घडला होता. नोकरीसाठी मी 35 लाख रुपये भरले आहेत. मला ही परीक्षा पास होणं आवश्यक आहे. कॉपी करु द्या, प्रश्नांची उत्तरं पाहून लिहू द्या अन्यथा कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करेन, अशी धमकी औरंगाबादेतील परीक्षार्थीने दिली होती.
कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू
औरंगाबादेतच जवळपास 15 दिवसांपूर्वी कॉपी करताना पकडल्याने व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारली होती. उपचारादरम्यान दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला होता.
कॉपी पकडलेल्या परीक्षार्थीची कर्मचाऱ्याला मारहाण, आत्महत्येची धमकी
कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद
Updated at:
24 Apr 2018 05:56 PM (IST)
औरंगाबादमधील विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात एमपीएड परीक्षेच्या पहिल्याच पेपरमध्ये सतीश कॉपी घेऊन जात होता, त्यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला मज्जाव केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -