औरंगाबाद : औरंगाबादच्या नंद्राबाद गावातल्या घराघरात आज मटणाच्या रस्स्याचा बेत आहे. घरातली प्रत्येक व्यक्ती मटण शिजवण्यात दंग आहे. आता तुम्ही म्हणाल यात विशेष काय? पण ज्या कारणासाठी हे मटण शिजवलं जातंय ते फार मजेशीर आणि रंजक आहे.

त्याचं झालं असं की नंद्राबाद गावात गेल्या महिन्यात गावातील 15 तरुणांचे वेगवेगळ्या ठिकाणी अपघात झाले. गावातील मंडळींनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली. गावकऱ्यांच्या चर्चेअंती, यंदा देवीला बोकडाचा बळी दिला नाही म्हणून हे संकट आलं, यावर एकमत झालं.

नंद्राबाद हे 1000-1500 लोकसंख्येचं गाव. गावात रस्ते चकाचक पण मनं आणि विचार मात्र अंधश्रद्धाळू. बरं ज्यांचे अपघात झाले ते तरुणही शिकले-सवरलेले. कोणी बारावी पास तर कोणी पदवीधर. पण मनात खोलवर रुजलेल्या अंधश्रद्धेमुळे यांच्या शिक्षणाचा पुरता भुगा झालेला. त्यांनाही आपला अपघात गावातील लक्ष्मीदेवी कोपल्यामुळे झाल्याचा विश्वास आहे.



मग गावकऱ्यांनी बकऱ्याचा बळी देण्याचं ठरवलं. त्यासाठी वर्गणी गोळा केली. बोकडाची वाजत-गाजत मिरवणूक काढली आणि बोकडाचा फडशा पडला.

ही घटना मजेशीर वाटत असली तरी पुरोगामी महाराष्ट्राच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. 21व्या शतकात एकीकडे प्रगतीचे आलेख उंचावत असताना, आजही अनेक गावं अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकली आहेत. बरं गाडीचा अपघात होण्याचा आणि गावच्या डोंगरावर बसलेल्या देवीचा काहीही संबंध नाही हे या शिकल्या-सवरलेल्या लोकांना कोण सांगणार?