औरंगाबाद : औरंगाबादमध्ये रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त रिक्षा चालकांची आणि पोलिस कर्मचाऱ्यांची नेत्र तपासणी झाली. मात्र ही  नेत्र तपासणी ज्या डॉक्टरने केली तो डॉक्टर बोगस असल्याचा आरोप  नेत्र रोगतज्ज्ञ असोसिएशनने केला आहे.

रस्ता सुरक्षा सप्ताहात डॉ. हिना ठाकूर आणि डॉ. विक्रम ठाकूर या दोघांनी पोलिस आणि रिक्षाचालकांची नेत्र तपासणी केली. मात्र हे दोन्ही डॉक्टर डोळ्याची तपासणी करण्यासाठी आपत्र असल्याचा आरोप होत आहे. विक्रम ठाकूर हे डोळ्याचे डॉक्टर नाहीत तर हिना ठाकूर यांनी त्यांच्या नावासमोर एम एस ऑप्थल ही पदवी लिहिली आहे.



परंतु बीएचएमएस केल्यानंतर एम एस करताच  येत नाही, मग त्यांच्या नावापुढे एमएस ऑप्थलमॉलॉजीही पदवी कशी?, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवाय पोलिसांनी अशा अपात्र डॉक्टरांकडून डोळ्यांची तपासणी केलीच कशी, असाही प्रश्न निर्माण होत आहे.
पोलिसांनीही मोठा गाजावाजा करत हा कॅम्प आयोजित केला. रिक्षाचालक आणि पोलिस अधिकाऱ्यांनी नेत्र तापसणीही केली. त्यामुळे शहरातील रिक्षाचालकांच्या आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या डोळ्याशी खेळ केला का?, असा प्रश्नही विचारला जात आहे.



याविषयी आम्ही डॉक्टर हिना आणि विक्रम ठाकूर यांच्याशी जाणून घेतले. त्यावेळी डॉ. हिना यांनी एम एस ऑप्थल असल्याचा दावा केला आहे. तर पती डॉक्टर आहेत, मात्र ते नेत्रतज्ज्ञ नाही, असंही त्यांनी नमूद केलं.