औरंगाबाद : आपण अनेक तक्रारीचे प्रकार पाहिले असतील, परंतु कोणी रस्त्याच्या विरोधात तक्रार केल्याचे ऐकिवात नसेल. पण औरंगाबादेत अशीच एक तक्रार झाली आणि तीही एका महिलेने केली आहे. औरंगाबाद शहरात राहणाऱ्या संध्या घोळवे-मुंडे यांनी चक्क रस्त्याविरोधात पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली आहे. राज्यातील अनेक रस्ते सध्या खड्डेमय झाले आहेत. त्यातूनच अनेक चाकरमान्यांना प्रवास करीत आपल्या इच्छित स्थळी पोहोचायला वेळ लागतो.


संध्या मुंडे या फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणून काम करतात. गेल्या 14 वर्षांपासून त्या औरंगाबाद ते फुलंब्री रस्त्यांने अप-डाऊन करतात. त्यामुळे त्या रस्त्याच्या प्रवासाला कंटाळल्या आहेत. औरंगाबाद ते फुलंब्री हा तीस किलोमीटरचा रस्ता. गेल्या तीन वर्षांपासून औरंगाबाद जळगाव रस्त्याचं काम सुरू आहे. त्यामुळे असंख्य त्रासांना त्यांना सामोरं जावं लागतं आहे. याच कामाचा कंत्राटदार काम सोडून गेला. रस्त्याचे काम अर्धवट झाल्याने तब्बल एक वर्ष नागरिकांचे हाल सुरू होते. संध्या मुंडे तर गेल्या 14 वर्षांपासून या रस्त्याच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळलेल्या आहेत.


कंटाळलेल्या संध्या मुंडे यांनी वैतागून थेट फुलंब्री पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी औरंगाबाद- फुलंब्री या रस्त्याविरोधातच पोलिसात तक्रार केली आहे. 'हा रस्ता मला मानसिक, शारीरिक , आर्थिक त्रास व्हावा या हेतूने धक्काबुक्की आणि अडवणूक करीत आहे. हा रस्ता सुधारेल अशी मला अशा होती. मात्र तसे न होता हा रस्ता दिवसेंदिवस प्राणघातक बनत चालला आहे,' असं त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.


या बाबत संध्या यांना विचारले असता त्यांनी सांगितलं की, या रस्त्यामुळे अनेक प्रकारच्या वेदना रोज सहन कराव्या लागत आहे. आमच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचण्यासाठी तक्रार दिली आहे. प्रशासनाने या बाबत संबंधितांवर कारवाई केली नाही तर न्यायालयाकडे दाद मागणार असल्याची प्रतिक्रिया संध्या घोळवे-मुंडे यांनी दिली आहे.