Aurangabad Crime News : औरंगाबाद (Aurangabad) शहरात वाढत्या नशेखोरीच्या घटनांमुळे सतत छोट्या-मोठ्या गुन्हेगारीच्या घटना घडताना पाहायला मिळत आहे. अशात आता नशेखोरांच्या हुल्लडबाजीमुळे शहरातील व्यापारी हतबल झाले आहेत. पोलिसांना निवेदन देऊन देखील नशेखोरांची दहशत संपत नाही. त्यातच सिडको परिसरात गुंडांच्या हैदोसमुळे व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही हैराण झाले आहेत. तसेच टीव्ही सेंटरच्या संजय गांधी मार्केटमधील नशेखोरांच्या हुल्लडबाजीला कंटाळून पुन्हा एकदा व्यावसायिकांनी मार्केट बंद केले होते. त्यामुळे गुन्हेगारांमधील औरंगाबाद शहर पोलिसांची दहशत संपली आहे का? असा प्रश्न नागरिक विचारत आहे. 


काही दिवसांपूर्वी म्हणजेच 8 ऑगस्ट रोजी टीव्ही सेंटरच्या संजय गांधी मार्केटमधील टवाळखोरांनी दोन व्यापाऱ्यांना मारहाण केली होती. या भागात सतत नशेखोरांच्या टोळक्यांची हुल्लडबाजी पाहायला मिळते. त्यामुळे व्यापारी हतबल झाले होते. दरम्यान, या मारहाणीनंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन छेडत मार्केट बंद ठेवले होते. त्यानंतर पोलिसांनी व्यापाऱ्यांची भेट घेऊन कारवाईचे आश्वासन दिले होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र आता गुरुवारी पुन्हा काही टवाळखोरांनी मद्यधुंद अवस्थेत व्यापाऱ्यांवर धावून जात शिवीगाळ केली. त्यामुळे महिना उलटूनही परिस्थितीत फरक न पडल्याने व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने बंद ठेवून, चौकात आंदोलन केले. त्यामुळे सिडको पोलिसांनी आता पुन्हा एकदा कारवाईचे आश्वासन दिले आहे.


दरम्यान, टीव्ही सेंटरच्या संजय गांधी मार्केटमधील टवाळखोरांच्या हुल्लडबाजीसोबतच सिडको परिसरात देखील गुंडांचा हैदोस पाहायला मिळत आहे. त्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकही हैराण झाले आहेत. असाच काही प्रकार 17 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास सिडको बसस्थानक परिसरात पाहायला मिळाला. गुंडांच्या एका टोळक्याने पार्किकमधील मुलांना मारहाण करत तेथील रुमच्या काचा फोडल्या. तब्बल तासभर गुंडांनी धिंगाणा घातला. या प्रकाराने बसस्थानकात आलेले प्रवासीही भयभीत झाले होते. विशेष म्हणजे एवढं सर्वकाही सुरु असताना पोलिसांना मात्र याची खबर नव्हती.


पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी...


यापूर्वी अमितेश कुमार हे पोलीस आयुक्त असतांना त्यांनी 'चार्ली पथका'ची स्थापना केली होती. हे पथक सतत शहरातील प्रत्येक भागात पेट्रोलिंग करत असत. त्यामुळे शहरात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनास्थळी ते तत्काळ पोहोचत असे. सोबतच त्यांच्या पेट्रोलिंगमुळे रस्त्यावर सुरु असलेले अनेक अवैध धंदे, महत्वाच्या ठिकाणी टवाळखोरी करणाऱ्यांवर वचक बसला होता. मात्र, सध्या शहरात वाढलेली नशेखोरी यामुळे अनेक गंभीर गुन्हे घडताना पाहायला मिळत आहे. त्यामुळे शहरात पोलीस पेट्रोलिंग वाढवण्याची मागणी केली जात आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


संतापजनक! मंदिरातून घराकडे निघालेल्या चार वर्षीय बालिकेवर अत्याचार; औरंगाबादेतील धक्कादायक प्रकार