मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या वक्तव्यावर शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी टीका केली आहे. राहुल गांधी यांचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचं ते म्हणाले. राहुल गांधी यांची भारत जोडो (Bharat Jodo) यात्रा महाराष्ट्रातच थांबवा आणि त्यांना कायद्याचं राज्य असल्याचं दाखवून द्या अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 


शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Bharat Jodo) यांच्यावर सडकून टीका केली आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर त्यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात थांबवा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे केली आहे. 


हे राज्य कायद्याचं आणि सावरकरांचं आहे असं दाखवून देऊया असं खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलं आहे. तसेच राहुल गांधी यांच्या वक्तव्याविरोधात कार्यकर्त्यांनी आंदोलन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. 


खासदार राहुल शेवाळे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत जोडो यात्रा कुणाला थांबवण्याचा अधिकार दिला आहे का असा सवाल त्यांनी केला. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा कोणीही थांबवू शकत नाही असंही त्या म्हणाल्या. 


काय म्हणाले होते राहुल गांधी?


कर्नाटकच्या तुमकूर या ठिकाणी भारत जोडो यात्रेच्या दरम्यान बोलताना राहुल गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका केली होती. ते म्हणाले की, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघ इंग्रजांना मदत करत होता, तर सावरकरांना इंग्रजांकडून भत्ता मिळत होता.  हे एतिहासिक तथ्य आहे की, स्वातंत्र्याच्या लढाईत हे कुठेही दिसले नाहीत. हे सत्य भाजपच्या नेत्यांनी मान्य करावं. काँग्रेस पक्षातील नेत्यांनी स्वातंत्र्याच्या लढाईत इंग्रजांविरोधात लढा दिला. अनेक वर्ष त्यांना तुरुंगात राहावं लागलं. महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरु, वल्लभभाई पटेल यांच्यासह अनेक नेत्यांनी इंग्रजांविरोधात लढा दिला. द्वेष पसरणारे व्यक्ती कोण आहेत आणि ते कोणत्या समाजातून आले, याचा काहीही फरक पडत नाही.  द्वेष आणि हिंसा पसरवणे हे देशाविरोधी कार्य आहे. आम्ही त्या प्रत्येक द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तीविरोधात लढणार आहोत."