औरंगाबाद : कचराकोंडीत फसलेल्या औरंगाबादेत आता कचऱ्यावर कर लागणार आहे. घरातील, घरासमोरचा, दुकानातील सगळ्याच कचऱ्यावर महापालिका ग्राहक कर लावणार आहे. स्वच्छचा कराच्या माध्यमातून मिळणारा पैसा पुरेसा नाही. त्यामुळे या माध्यमातून महापालिका कर जमा करून कचरा निर्मूलनासाठी वापरणार आहे.


कचराकोंडीने औरंगाबाद शहराची वाट लागली आहे. गेल्या चार महिन्यांपासून  शहराची कचऱ्याने नाकेबंदीच केली आहे. महापालिकेने अनेक प्रयत्न केले, मात्र सगळेच निष्फळ ठरले. त्यात आता एक नवा फंडा काढलाय. आता शहरातील कचरा उचलण्यावर कर लावण्यात येणार आहे. घनकचरा व्यवस्थापन नियम 2016 नुसार नागरिकांकडून ग्राहक शुल्क आकारणी करण्यात येईल.

कसा असेल कर?

निवासी घरातून दिवसातून एक वेळ कचरा उचलण्यात येईल आणि एक रुपया प्रतिदिन कर लागेल, वर्षाला 365 रुपये

छोटे व्यावसायिक यांचा दोन वेळा कचरा घेण्यात येईल, प्रतिदिन दोन रुपये कर लावण्यात येईल, वर्षाला 730 रुपये

हॉटेल्स, मोठे व्यावसायिक यांच्याकडून 10 रुपयांपासून ते 100 रुपयांपर्यंत कर आकारण्यात येईल.

यामाध्यमातून शहरातील दोन लाख 20 हजार घरं आणि 22500 व्यावसायिक आस्थापनांमधून वर्षाचे 10 कोटींचे उत्पन्न अपेक्षीत आहे. स्वच्छता कर वसूल केला जातोय, मात्र त्यातून म्हणावं तसं उत्पन्न मिळत नाही. म्हणून या नव्या कराचा फंडा महापालिका आता राबवणार आहे.

व्यापाऱ्यांचा कराला विरोध

दुसरीकडे व्यापाऱ्यांनी मात्र याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने चर्चेविनाच कर लावण्याचा सपाटा लावलाय. स्वच्छता कराच्या माध्यमातून आम्ही कर भरतच असल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.

कराच्या माध्यमातून आता महापालिका शहर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं तर महापालिका स्वतः जे काही करते त्यातून शहर कचरामुक्त करणं त्यांना अजूनही शक्य झालं नाही. त्यात आता या अशा पद्धतीने कर लावून महापालिका नक्की काय साध्य करणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलाय.