औरंगाबाद : औरंगाबादमध्ये अतिक्रमण हटवायला आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांना शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंनी चक्क शिवीगाळ करुन मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे. अशा प्रकारचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


सध्या औरंगाबाद पालिकेचे आयुक्त ओमप्रकाश बकोरियांनी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली आहे. त्यात सर्व धर्मातील धर्मस्थळांचा समावेश आहे. मात्र कायम फक्त मंदिरं का हटवता?, असा सवाल करत खैरेंनी अधिकाऱ्यांना पळून जा, नाहीतर मार खाल, असा दम दिलाय.

इतकंच नाही तर आयुक्त ओमप्रकाश बकोरिया जरी आले, तरी त्यांनाही मार खावा लागेल अशी धमकी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. सत्ताधारी पक्षाच्या खासदाराची ही दमदाटी कॅमेऱ्यात कैद झाल्याने खळबळ उडाली आहे.

खासदार खैरेंकडून वक्तव्याचं समर्थन

अधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा करुन प्रश्न सोडवायला पाहिजे. मात्र अधिकारी धार्मिक भावनांचा विचार करत नसल्याचा आरोप खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. शिवाय आपण केलेल्या वक्तव्यावर आपण ठाम असून जुनी मंदिरं तोडली जाऊ नये, यासाठी कायम लढत राहिल, असं खैरेंनी म्हटलं आहे.

खैरेंवर गुन्हा दाखल करा : काँग्रेस

औरंगाबादमध्ये शिवसेनेची गेल्या कित्येक वर्षांपासून सत्ता आहे. तिथे, रस्ते, पाणी असे अनेक प्रश्न असताना सेनेकडून नागरिकांना धार्मिक भावनांमध्ये अडकवून ठेवलं जात असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्त सचिन सावंत यांनी केली आहे.

अधिकाऱ्यांशी अर्वाच्य भाषेत बोलणं आणि मारण्याची धमकी देणं हे लोकप्रतिनिधीला न शोभणारं आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सचिन सावंत यांनी केली आहे.

पाहा धमकीचा व्हिडिओ :