औरंगाबाद : औरंगाबादच्या कारागृहात खूनाच्या आरोपात शिक्षा भोगत असलेल्या आरोपीच्या नावावर पैसे टाकत अनुदान लाटण्यात आलं आहे. सरकारी बाबू आणि काही बँक कर्मचाऱ्यांनी कोणत्याही कारणाशिवाय या आरोपीच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली आणि तशीच ती काढलीही. इतकंच नाही तर काही राजकारण्यांच्या खात्यातही तब्बल 8 लाखांची रक्कम भरली आहे.
औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील तहसील कार्यालयाचा अनुदान वाटपाचा घोळ या प्रकाराने समोर आला आहे. ज्या व्यक्तींच्या नावावर एक इंच जमिनही नाही अशा अनेक लोकांच्या खात्यात तलाठी आणि तहसीलदारांनी संगनमत करुन अनुदान जमा केलं आहे. एकाच व्यक्तीच्या नावे जिल्हा बँकेत वेगवेगळ्या शाखेत 7 ते 8 बोगस बँक खाती काढून 10 ते 12 लाखांचं अनुदान लाटण्यात आलं आहे.
खून खटल्यातील आरोपीसह अनेकांच्या बँक खात्यात अनुदान जमा करुन लगेच काढूनही घेण्यात आलं आहे. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेची तुर्काबाद शाखा यात आघाडीवर आहे. कैदी, राजकारणी आणि काही पत्रकारांनाही या अनुदानाची खिरापत वाटण्यात आली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून या घोटाळ्याची फाईल जिल्हाधिकाऱ्यांच्या टेबलवर आली आहे. मात्र जिल्हाधिकारी कारवाई करण्याऐवजी केवळ चौकशीच करत असल्याचा आरोपही होत आहे.