शिर्डी : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शिर्डी येथील साई संस्थानच्या विश्वस्तांकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर मुनगंटीवार माध्यमांशी बोलत असताना विश्वस्त प्रताप भोसले यांनी त्यांना बाहेर जाऊन बोलण्यास सांगितलं.


शिर्डी येथे साईमंदीर विश्‍वस्‍तांच्‍या जागतिक परिषदेचं उद्घाटन आज सुधीर मुनगंटीवार, जलसंपदा मंत्री गिरीष महाजन, विरोधी पक्ष नेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या उपस्थितीत झालं. यावेळी देशभरातील 1100 तर विदेशातील 43 असे साई मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते.

कार्यक्रम संपल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांना पत्रकारांशी बोलत असताना रोखण्यात आलं. संस्थानचे विश्वस्त प्रताप भोसले यांनी मुनगंटीवार यांना पत्रकारांशी बोलत असताना रोखून बाहेर जाण्यास सांगितल्यानं एकच खळबळ उडाली.

विशेष म्हणजे सरकारने निवड केलेल्या विश्वस्तांकडूनच मंत्र्यांना अशी वागणूक मिळाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. घडलेल्या प्रकाराबाबत प्रत्यक्षदर्शी शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी निषेध केला असून विश्वस्त प्रताप भोसले यांच्या कृत्याचा निषेध केला आहे.