औरंगाबाद : आंबा खाल्लं की मुलं होतात, या भिडे गुरुजींच्या वक्तव्यानंतर आता औरंगाबादमधील एका मौलवीनं अजब दावा केला आहे. खुल्ताबादमधील दर्ग्यात दोन झाडं आहेत. त्यातील एका झाडाचं फळ खाल्लं की मुलगा होतो आणि दुसऱ्या झाडाचं फळ खाल्लं की मुलगी होते, असा दावा या मौलवींनी केला आहे.


एवढ्यावरच हे मौलवी थांबले नाहीत, या झाडांची फळं खाल्ल्यानंतर तृतीयपंथीयांनादेखील मुलं झाल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मुलं झालेल्या तृतीयपंथीयांची समाधीदेखील याठिकाणी असल्याचं मौलवींनी सांगितलं.


याशिवाय दर्ग्याजवळ असलेल्या तलावात रात्री नग्न आंघोळ केल्यास कर्करोग आणि एड्ससारख्या गंभीर रोगांवरही निदान होतं, असाही दावा या मौलवींनी केला आहे.


औरंगाबाद अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसह या दर्ग्यावर छापा टाकला. अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं पहिल्यांदाच एखाद्या दर्ग्यातील अंधश्रद्धा अशारीतीने समोर आणली आहे.