वाशिम : वाशिमचे जवान सुनील धोपे यांच्या मृत्यूप्रकरणी आज वाशिम बंदची हाक देण्यात आली आहे. खासदार भावना गवळी यांनी ही बंदची हाक दिली आहे. सुनील धोपे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून हत्या झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केला आहे.


सुनील धोपे हे बीएसफचे जवान होते. मेघालयाच्या शिलाँगमध्ये ते आपलं कर्तव्य बजावत होते. तीन दिवसांपूर्वी सुनील धोपे यांना वीरमरण आल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियांना आली होती. मात्र जिल्हा प्रशासनाला त्यांचा मृतदेह बाथरुममध्ये आढळल्याचं कळवण्यात आलं. शिवाय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचं सुनील धोपेंनी फोनवरुन आपल्या कुटुंबियांनाही सांगितलं होतं.


काल सुनील धोपे यांचं पार्थिव वाशिममध्येच आणण्यातं आलं आहे. मात्र कुटुंबाने शव घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. संबंधित अधिकारी, जवान यांच्यावर कारवाई होणार नाही, तोपर्यंत शव घेणार नाही आणि अंत्यविधीही करणार नाही, अशी भूमिका धोपे यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे. तसेच धोपे यांना शहीद घोषित करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.


काय आहे प्रकरण?
वाशिमचा सुनील धोपे हे मेघालयातील शिलाँगमध्ये बीएसएफमध्ये कर्तव्य बजावत होता. दहशतवाद्यांच्या गोळीबारात सुनील शहीद झाल्याची आधी बातमी आली, मात्र त्यानंतर सुनील यांचा मृतदेह बाथरुममध्ये आढळून आल्याचं जिल्हा प्रशासनाने कळवलं.


महत्त्वाचं म्हणजे दोन दिवसांपूर्वी फोनवर बोलताना सुनीलने आपल्याला चार वरिष्ठ अधिकारी त्रास देत असल्याचं सांगितलं होतं. आपल्या जीवाला धोका असल्याचंही सुनील धोपेंनी सांगितल्याचा दावा कुटुंबीयांनी केला. संभाषणाची ऑडिओ क्लिपही नातेवाईकांकडे आहे. सुनील धोपे यांचं नेमकं काय झालं, हा प्रश्न उपस्थित होत आहे.