औरंगाबाद : औरंगाबादमध्ये बांधकाम सुरु असलेली स्वागत कमान कोसळल्याने त्याखाली दबून दोन मजुरांचा मृत्यू झाला. फुलंब्री तालुक्यातील निधोना भागात मंगळवारी संध्याकाळी ही घटना घडली.
सोनू आलाने, बालाजी रामभाऊ भिसे या दोघा मजुरांचा कमानीखाली दबून मृत्यू झाला, तर सात मजूर जखमी झाले आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून निधोना ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने स्वागत कमानीचं बांधकाम सुरु आहे. लोकवर्गणीतून सुमारे साडेचार लाख रुपये खर्च करुन या कमानीच्या बाजूच्या दोन कॉलमचं काम पूर्ण झालं होतं. कमानीवरील स्लॅब भरण्याचं काम सुरु असताना लाकडी बल्ल्या अचानक तुटून स्लॅब कोसळली.
स्लॅबखाली दबून दोन मजुरांचा जागीच मृत्यू झाला, तर उर्वरित सात जणांना गावकऱ्यांनी जेसीबीच्या मदतीने बाहेर काढलं. सातपैकी चार जण गंभीर झाले असून जखमींवर औरंगाबादमधील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.