जगन्नाथ सोनवणे (वय 56 वर्ष) यांनी औरंगाबादच्या देवगाव रंगारी गावात मंगळवारी (24 जुलै) दुपारी विषप्राशन केलं होतं. मात्र बुधवारी (25 जुलै) पहाटे औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
जगन्नाथ सोनवणे यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेकडून दोन लाख रुपयांची मदत देण्यासाठी खासदार चंद्रकांत खैरे आणि शिवसेनेचे पदाधिकारी त्यांच्या घरी गेले होते. मात्र कुटुंबीयांनी मदत नाकारली. "आम्ही मोलमजुरी करुन जगू, पण पैसे घेणार नाही. जगन्नाथ सोनवणे यांनी पैशांसाठी नाही, तर मराठ्यांना आरक्षण मिळावं, यासाठी आत्महत्या केली. मराठा समाजाला मदत करायची असेल तर स्वत:च्या खासदारकीचा राजीनामा देऊन पाठिंबा द्या," असे खडेबोलही सुनावले.
या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ व्हॉट्सअपवर शेअर होत आहे. परंतु या व्हिडीओची सत्यता एबीपी माझाने पडताळलेली नाही.
दरम्यान याआधीही चंद्रकांत खैरेंना मराठा आंदोलकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. मराठा आरक्षणासाठी गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केलेल्या काकासाहेब शिंदे यांच्या अंत्यसंस्कारसाठी हजेरी लावणाऱ्या चंद्रकांत खैरेंना मराठा मोर्चेकरांनी अक्षरश: हाकलून लावलं. तसंच अनेक जण त्यांच्यावर धावूनही गेले होते.
मराठा आरक्षणासाठी पाचवी आत्महत्या
- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी ही पाचवी आत्महत्या आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कायगाव टोका गावात 22 जुलैला काकासाहेब शिंदे या तरुणाने गोदावरी नदीत उडी मारुन आत्महत्या केली होती.
- त्यानंतर 24 जुलैला औरंगाबादच्या गंगापूर तालुक्यातील देवगाव रंगारी येथील जगन्नाथ सोनवणे यांनी विष प्राशन केल. उपचारादरम्यान त्यांचा 25 जुलैला मृत्यू झाला.
- मग 29 जुलैला नांदेडमधील दाभड येथील कचरु दिगंबर कल्याणे या 42 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली.
- त्यानंतर सोमवारी 30 जुलैला मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी औरंगाबादमध्ये मुकुंदवाडी इथे राहणाऱ्या प्रमोद होरे पाटील या 31 वर्षीय तरुणाने रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे प्रमोदने आत्महत्या करण्यापूर्वी फेसबुकवर मराठा आरक्षण मिळावं, यासाठी आत्महत्या करत असल्याची पोस्ट लिहिली होती.
- आज 31 जुलैला बीडमध्ये 35 वर्षीय अभिजीत देशमुखनं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केली.