औरंगाबाद: औरंगाबादमधल्या कचरा प्रश्नाने आता उग्र रुप धारण केलं आहे. कचऱ्यामुळं हैराण झालेल्या संतप्त नागरिकांनी कचऱ्याची गाडी फोडली आणि कचराडेपोच्या परिसरात ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे.

महापुरुषांच्या प्रतिमा समोर मांडून नागरिक भजन आंदोलन करत आहेत. आज सोळाव्या दिवशी महापालिकेने तीसगाव परिसरातील गोलवाडी कचरा डेपो परिसरात कचरा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र गोलवाडी आणि तीसगाव परिसरातील नागरिकांनी हा प्रयत्न हणून पाडला.

एक छोटी रिक्षा कचरा घेऊन आली असता नागरिकांनी त्यावर दगडफेक केली.  यावेळी जमावाला समजवण्यासाठी आलेल्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांनाही धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न झाला.

विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक

दरम्यान, औरंगाबादचा कचरा प्रश्न सोडवण्यासाठी आज विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली. सर्व अधिकारी आणि नारेगावचे ग्रामस्थ या बैठकीला उपस्थित होते. यावेळी प्रशासन आणि राज्य शासनाकडून विभागीय आयुक्त यांनी नारेगावच्या ग्रामस्थांची समजूत काढत, त्यांना 3 महिने मुदतीची मागणी केली.  यात नारेगावच्या कचऱ्याचा प्रश्न सोडवण्यासोबत, नारेगावच्या विकासासाठी विशेष निधी देण्याचीही आयुक्तांनी तयारी दर्शवली.

मात्र गावकरी त्यांच्या आधीच्या निर्णयावर ठाम आहेत, कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेण्यास गावकरी तयार नाहीत. त्यामुळं प्रशासनाने आज तोडगा काढण्याच्या केलेला प्रयत्न असफल ठरला. गावकरी पुन्हा गावात जाऊन लोकांसोबत चर्चा करणार आणि त्यानंतर पुन्हा बैठक होण्याची शक्यता आहे.

काय आहे औरंगाबादमधील कचऱ्याचा प्रश्न?

गेल्या कित्येक वर्षांपासून शिवसेनेची महापालिकेत सत्ता असलेल्या औरंगाबाद शहरात सध्या नागरिकांना श्वास घेणंही कठीण झालं आहे. कारण, गेल्या 16 दिवसांपासून शहरातून कचरा उचलला गेलेला नाही.

औरंगाबादपासून 15 किलोमीटरवर असलेल्या नारेगावच्या कचरा डेपोत सध्या कचरा टाकला जातो. मात्र, तिथल्या ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध केल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. कचऱ्यावर कुठलीही प्रक्रिया होत नसल्याने आणि त्याची विल्हेवाट नीट लावली जात नसल्याने रोगराई आणि घाणीचं साम्राज्य वाढल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

या पेचामुळे औरंगाबादचं आरोग्य धोक्यात आलेलं असतानाही आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे, संजय शिरसाठ आणि खासदार चंद्रकांत खैरे मात्र निश्चिंत आहेत.

विशेष म्हणजे हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आदेश दिले आहेत. मात्र अद्याप कुठलाही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे आज नारेगावच्या ग्रामस्थांशी होणाऱ्या चर्चेत विभागीय आयुक्तांना यश मिळतं का? हे पाहणं महत्त्वाचं आहे.