औरंगाबाद : गेल्या दहा दिवसांपासून औरंगाबाद शहरात कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. काल विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कचराकोंडी फोडण्याचा दुसरा प्रयत्न केला. मात्र, तो प्रयत्न पुन्हा अपयशी ठरला आहे.
बागडे यांनी काल नारेगावच्या ग्रामस्थांशी पुन्हा चर्चा केली. मात्र, आंदोलक कचरा न टाकू देण्यावर ठाम आहेत.तर पालकमंत्री दीपक सावंत आणि खासदार चंद्रकांत खैरे यांनीही ग्रामस्थांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही अपयश आले.
सध्या औरंगाबादेत ठिकठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलं आहे. त्यामुळे 15 लाख शहरवासीयांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
दरम्यान, शहरातील कचरा लवकरात लवकर उचलण्यात यावा, यासह इतर मागण्यांसाठी राहुल कुलकर्णी या नागरिकांने औरंगाबाद खंडपीठात एक जनहित याचिकाही दाखल केली आहे.या याचिकेवर आज औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे.
काय आहे प्रकरण?
नरेगावमध्ये महापालिकेचा कचरा डेपो आहे. हा डेपो बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने 15 वर्षांपूर्वी दिले होते. यानंतर महापालिकेने पर्यायी जागेचा शोध सुरु केला. पण महापालिकेला अद्याप पर्यायी जागा मिळाली नाही.
त्यामुळे नारेगावचे लोक रस्त्यावर उतरले आणि त्यांनी गावाजवळील कचरा डेपोत कचरा न टाकू देण्याची भूमिका घेतली. तेव्हापासून शहरात कचराकोंडी सुरु झाली. हा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांसोबत पालकमंत्री दीपक सावंत, औरंगाबादचे महापौर आणि आयुक्त यांची बैठक झाली. त्यानंतर दीपक सावंत यांनी ग्रामस्थांशी चर्चा करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
त्यानुसार, पालकमंत्री दीपक सावंत यांच्यासह अनेक मंत्र्यांनी ग्रामस्थांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण यात कोणालाही यश आलं नाही. काल हरिभाऊ बागडे यांनीही ग्रामस्थांसोबत चर्चा केली. पण ग्रामस्थांनी कचरा न टाकू देण्याची ठाम भूमिका घेतली. त्यामुळे सध्या औरंगाबाद शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.