'भंडारी औकातीत राहा, आम्ही कधी सोमय्यांना शक्ती कपूर म्हटलंय का?'
एबीपी माझा वेब टीम | 24 Jun 2016 09:16 AM (IST)
औरंगाबाद : भाजप प्रवक्ते माधव भंडारींची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंबाबत बोलायची औकात नाही. त्यांनी यापुढे उध्दव ठाकरेंविरोधात बोलू नये. शिवसैनिक हा माथेफिरु असतो आणि तो काहीही करु शकतो. तसंच आम्ही कधी किरीट सोमय्यांना शक्ती कपूर म्हटलंय का? अशा शब्दात शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांनी माधव भंडारींना आणि भाजपला धमकी वजा इशारा दिला आहे. त्यामुळे शिवसेना विरुद्ध भाजप हे मुद्द्यावरचं भांडण गुद्द्यावर येण्याची शक्यता आहे. माधव भंडारी यांनी मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरेंवर टीका केली. उद्धव ठाकरेंची तुलना शोलेमधील असरानीबरोबर केली. त्यानंतर शिवसेनाही आक्रमक झाली आहे. मुंबईतील शिवसेनेच्या नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनीही भाजपवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरेंना जर असरानी म्हणत असाल, तर भाजप अध्यक्ष अमित शाह हे गब्बर सिंह आहेत. ज्या पद्धतीने अमित शाह कारभार करतायत ते पाहता ‘शोले’मध्ये शेवटी जी हालत गब्बरची झाली, तीच हालत भाजपच्या या गब्बर सिंघची व्हायला वेळ लागणार नाही, असा हल्लाबोल शिवसेनेच्या मुंबईच्या मनपातील नगरसेविका किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. माधव भंडारी 'मनोगत'मध्ये काय म्हणाले? मनोगत या भाजपच्या पाक्षिकातून उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊतांवर टीकेची झोड उठवली. ‘राऊत साहेब तलाक केव्हा घेताय’, असं शिर्षक देऊन भाजप सरकारचा निजामांचा बाप असा उल्लेख करणाऱ्या राऊतांवर भाजपचे प्रवक्ते माधव भंडारींनी टीका केली. तसंच या पाक्षिकात उद्धव ठाकरेंची तुलना ‘शोले’ सिनेमातल्या जेलरच्या भूमिका साकारणाऱ्या ‘असरानी’ यांच्याशी करून खिल्ली उडवली आहे. संबंधित बातम्या