औरंगाबाद : कॉपी करताना पकडलेल्या तरुणाचा आक्रस्ताळेपणा औरंगाबादमध्ये पाहायला मिळाला. नोकरीसाठी 35 लाख रुपये भरले आहेत, कॉपी करु द्या, अन्यथा आत्महत्या करेन, अशी धमकी परीक्षार्थीने दिली. धक्कादायक म्हणजे हाच तरुण पुढे शिक्षक होणार आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीएड अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा सध्या सुरु आहेत. 27 एप्रिलपर्यंत या परीक्षा चालणार असून शनिवारी विज्ञानातील understanding discipline and pedagogy of school subject science विषयाचा पेपर होता.

डॉ. रफिक झकेरिया कॉलेज फॉर वुमन, नवखंडा या परीक्षा केंद्रावर एम थ्री हॉलमध्ये पेपर सुरु होता. सकाळी 11 वाजून 10 मिनिटं झाली असताना एका विद्यार्थ्याला पर्यवेक्षकांनी कॉपीसह पकडलं. खात्री करण्यासाठी उत्तरपत्रिका जमा केल्यावर विद्यार्थ्याने थेट धमकीच दिली.

नोकरीसाठी मी 35 लाख रुपये भरले आहेत. मला ही परीक्षा पास होणं आवश्यक आहे. कॉपी करु द्या, प्रश्नांची उत्तरं पाहून लिहू द्या अन्यथा कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या करेन, अशी धमकी देत हा परीक्षार्थी पळत सुटला. त्यानंतर घाबरलेल्या कर्मचाऱ्यांनी समजावत त्याला परत वर्गात आणून बसवलं आणि शांत केलं.

कॉलेजच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू

जेमतेम दहा दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये कॉपी करताना पकडल्याने व्यथित झालेल्या विद्यार्थ्याने कॉलेजच्या इमारतीवरुन उडी मारली होती. उपचारादरम्यान दुसऱ्याच दिवशी त्याचा मृत्यू झाला होता.