औरंगाबाद : दिल्लीच्या एका महाकाय महिला पहिलवानानं दिलेलं कुस्तीचं आव्हान स्वीकारुन तिला चीतपट करण्याचा पराक्रम औरंगाबादच्या एका चिमुरडीनं केला आहे. 18 वर्षांच्या सय्यदाने 35 वर्षांच्या शिवानीला अस्मान दाखवलं.


औरंगाबादमधल्या हर्सुल गावच्या या पराक्रमी पैलवानाचं नाव सय्यदा अमरिन आहे. दिल्लीच्या शिवानीनं खरं तर हर्सुलमधल्या पुरुषांना आपल्याशी कुस्ती करण्याचं आव्हान दिलं होतं. पण तिचं आव्हान सय्यदा अमरिननं स्वीकारलं.

दिल्लीच्या पैलवानासमोर या मुलीचा काय निभाव लागणार, असा प्रश्न मैदानातील प्रत्येकाच्या मनात होता. कुस्ती सुरु झाली, तेव्हा साहजिकच दिल्लीची पैलवान भारी पडत होती. सगळ्यांच्या नजरा या कुस्तीकडे लागल्या होत्या आणि अचानक सय्यदा अमरीन या कोवळ्या मुलीनं बांगडी डाव टाकला. डोळ्याची पापणी  लवेपर्यंत तिने समोरच्या बलाढ्य शिवानीला चितपट केलं.



शिवानी आणि सय्यदा यांच्यामधली ही कुस्ती खरंतर खूपच विषम होती. कारण 35 वर्षांची आणि 72 किलो वजनाची शिवानी सय्यदापेक्षा अनुभवानं आणि अंगापिंडानं भारी होती. पण 18 वर्षांच्या आणि 49 किलो वजनाच्या सय्यदानं कुस्तीत कमाल केली.

सय्यदा अमरीन ही औरंगाबाद जिल्ह्यतल्या फुलंब्री तालुक्यातल्या गणोरी या छोट्याशा गावातली मुलगी. ती औरंगबादच्या बेगमपुऱ्यात कुस्तीचा सराव करते. औरंगाबाद जिल्हा आणि परिसरात यात्रा-जत्रांमध्ये कुठे कुस्तीची दंगल होणार असेल तर त्या ठिकाणी सय्यदा आवर्जून उपस्थित राहते आणि भल्या भल्या पहिलवानांना चितपट करते.