मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे 2015 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेत अहमदनगर जिल्ह्यातील अतुल कानडेने राज्यात अव्वल येण्याचा बहुमान मिळवला आहे. अतुल कानडे यांची राज्याच्या उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. ज्यात राज्यभरातील 368 राजपत्रित अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
अहमदनगरच्या रासनेनगरमध्ये राहणाऱ्या अतुल कानडेने पुण्यातील इंजिनीअरिंगचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
तर मुलींमध्ये मेघा ढोले, प्रणाली खोचरे आणि रोहिणी नऱ्हे या तिघींनी संयुक्तपणे पहिला क्रमांक पटकावला आहे. मेघा ढोले यांची तहसीलदार, प्रणाली खोचरे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी तर रोहिणी नऱ्हे यांची नायब तहसीलदार पदी निवड करण्यात आली आहे.
कौतुकास्पद बाब म्हणजे यवतमाळच्या रवींद्र राठोड यांना वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी उपजिल्हाधिकारी पद मिळालं आहे.
5 फेब्रुवारी 2015 रोजी राज्यातील 36 जिल्हा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. 1 लाख 70 हजार 237 उमेदवारांनी ही परीक्षा दिली. त्यापैकी 4 हजार 722 उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले. तर 12 ते 14 सप्टेंबरला मुख्य परीक्षा झाली. त्यातून 1 हजार 138 उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरले. यानंतर 368 जणांची विविध पदांसाठी निवड करण्यात आली.