यवतमाळ : लग्नाच्या चार दिवस आधी ठरलेलं लग्न होऊ नये म्हणून होणाऱ्या नवऱ्याला शितेपेयातून विष पाजण्याचा प्रयत्न तरुणीने केला. प्रियकराच्या सांगण्यावरून या तरुणीने होणाऱ्या नवऱ्याला मारण्याचा प्रयत्ना केला आहे. याबाबत तरुणीने नेर पोलिसांसमोर कबुली दिली असून तरुणी आणि आरोपी प्रियकराला पोलिसंनी ताब्यात घेतलं आहे.
जळगावातील नेर तालुक्यातील कोहळा येथील 22 वर्षीय तरुणाचा बाभुळगाव तालुक्यातील मुलीशी 19 एप्रिल रोजी विवाह ठरला होता. दरम्यान लग्नाची तारीख जवळ आल्यावर नववधूच्या प्रियकराने होणाऱ्या नवऱ्याचा काटा काढण्यासाठी कट रचला. शीतपेयामध्ये विषारी पावडर टाकण्यास प्रियकराने तरुणीला सांगितले. त्याप्रमाणे नवऱ्या मुलाची तब्येत बिघडून ठरलेल्या मुहूर्तावर होणारं लग्न रद्द होईल. त्यानंतर आपण पळून जाऊ असं प्रियकराने तरुणीला सांगितलं. अशी माहिती तरुणींना पोलिसांना दिली आहे.
आई वडिलांनी ठरवून दिलेले लग्न तरुणीला मान्य नव्हते. त्यामुळे तिने प्रेमसंबंधात अडसर ठरलेल्या होणाऱ्या नवऱ्याला लग्नाच्या चार दिवस आधी नेर येथील एका आईस्क्रीम पार्लरमध्ये बोलावून घेतलं. तेथे त्याला शीतपेयामध्ये विष पाजले, हे पोलीस तपासात उघड झाले आहे. दरम्यान लग्नाच्या पत्रिका वाटणाऱ्या नवऱ्या मुलास आईस्क्रीम पार्लरमधून निघाल्यानंतर नेरच्या थोडे पुढे दुचाकीने जात असताना चक्कर आली.
तरुणांची तब्येत अचानकपणे खालावली त्यामुळे त्याला त्याच्या मित्रांनी आधी नेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले आणि त्यानंतर त्याला यवतमाळ येथे 13 ते 14 दिवस उपचार घ्यावे लागले. उपचारांनंतर बरे झालेल्या तरुणाची पॉयझनिंगमुळे प्रकृती बिघडली हे लक्षात आले होते. त्यामुळे याबाबत त्याने नेर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी नेर येथील आईस्क्रीम पार्लरमधील सीसीटीव्ही फूटेज तपासणी केली आणि तरुणीकडे याबाबत विचारपूस केली. त्यानंतर ठरलेलं लग्न टाळण्यासाठी प्रियकराच्या सांगण्यावरून हे सर्व केल्याची कबुली तरुणीने नेर पोलिसांना दिली.
या घटनेनंतर नेर पोलिसांनी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, हत्येचा कट रचणे यासारखे गंभीर गुन्हे तरुणी आणि तिच्या दोन भावांवर दाखल केले असून प्रियकरालाही ताब्यात घेतलं आहे.