वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांवर प्राणघातक हल्ला
एबीपी माझा वेब टीम | 01 May 2019 08:54 AM (IST)
सावकारकीच्या व्यवहारातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. हल्ल्याची घटना घडताच माऊली आणि तानाजी यांना तात्काळ पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
पंढरपूर : पंढरपूर बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्ह्याअध्यक्ष व बहुजन वंचित विकास आघाडीचे जिल्हा संघटक माऊली हळणवर आणि तानाजी हळवणर या दोघांवर मंगळवारी प्राणघातक हल्ला झाला आहे. यात दोघे गंभीर जखमी झाले आहे. सावकारकीच्या व्यवहारातून हा प्राणघातक हल्ला झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर येत आहे. पंढरपूरच्या ईश्वर वठार परिसरात हळवणर यांचं घर आहे. चार ते पाच जणांच्या टोळीने घरात घुसून हळवणर यांच्यावर हल्ला केला. धारदार शस्त्राने वार केल्यामुळे माऊली आणि तानाजी हळवणर यांना गंभीर दुखापत झाली आहे. सावकारकीच्या व्यवहारातून हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. हल्ल्याची घटना घडताच माऊली आणि तानाजी यांना तात्काळ पंढरपूरच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. दरम्यान, या प्रकारणी गुन्हा दाखल झाला आहे. पण यापूर्वी पंढरपूर तालुका पोलिसांनी जर हा गुन्हा दाखल करुन घेतला असता तर हा प्रकार टाळता आला असल्याचेही बोलेल जात आहे. या घटनेवरुन पोलीस आणि सावकार यांचे अभद्र नाते उघड झाले आहे.