अकोला : खंजेरीवादक सत्यपाल महाराज यांच्यावर गेल्या आठवड्यात चाकूहल्ला झाल्याचं धक्कादायक वृत्त समोर येत आहे. मुंबईतल्या नायगावमध्ये महाराजांवर हल्ला झाल्याची माहिती आहे. सुदैवाने सत्यपाल महाराज यांची प्रकृती ठीक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.


12 मे रोजी मुंबईत भीमजयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर एक व्यक्ती त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी पुढे आली. चेहऱ्यावर रुमाल बांधलेल्या संबंधित व्यक्तीला सत्यपाल महाराजांनी रुमाल काढण्यास सांगितलं. पण त्याचवेळी त्याने खिशातून चाकू काढून महाराजांवर हल्ला चढवला.

हल्लेखोराचा पहिला वार सत्यपाल महाराजांच्या हातावर बसला. सुदैवाने उपस्थितांनी त्याला पकडलं आणि भोईवाडा पोलिसांच्या हवाली केलं.

सत्यपाल महाराजांना प्राथामिक उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र किरकोळ जखमांवर उपचार करुन त्यांना सोडून देण्यात आलं. महाराज सध्या अकोला जिल्ह्यातील अकोटमध्ये असून त्यांनी आपली प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं.

कुणाल जाधव असं हल्लेखोर आरोपीचं नाव असून त्याने केलेल्या हल्ल्यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.